मुंबई - कोरोना काळात जीवाची पर्वा न करता दिवस रात्र सेवा देणा-या कंत्राटी कामगारांना कोरोना योद्ये म्हणून सन्मान करण्यात आला. मात्र कंत्राटी पध्दतीवर रुजू झालेल्या या कामगारांना सेवेतून मुक्त करण्यात आल्याने हे कोरोना योद्ये बेरोजगार झाले आहेत. या कंत्राटी कामगारांना महापालिकेने पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी म्युनिसिपल कामगार एकता युनियनने केली आहे. दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही युनियनने दिला आहे.
कोरोना काळात आरोग्यदूत म्हणून मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिकेत कंत्राटी स्वरुपात कामगारांना घेण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या सर्व कंत्राटी कामगारांना सेवेतून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत, असे युनियनने म्हटले आहे.
कोरोना रुग्णांच्या पूरक सेवेसाठी सरकारी, विविध पालिका रुग्णालयांमध्ये तातडीची भरती करण्यात आली होती. तेव्हा कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून या सर्व कामगारांनी कोरोना लढा दिला. या कामगारांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. कोरोना कमी झाल्यानंतर या सर्वांना सेवेतून कमी करण्यात आले.
पालिकांनी या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत दाखल करुन घेण्याची युनियनची मागणी आहे. मुंबई महापालिकेने कोरोना कालावधीत सुमारे पाच हजार कंत्राटी कामगार नेमले होते. त्या सर्वांनी या कालावधीत केलेली सेवा महत्त्वाची नव्हती का, असा सवाल या कामगारांनी केला आहे. पालिकेने त्यांना प्राधान्यक्रमाने सेवेत घेण्याची मागणी युनियनचे अध्यक्ष मनोज यादव यांनी केली आहे.
कामगारांच्या प्रश्नांवर परळमधील शिरोडकर सभागृहात मेळावा घेण्यात आला होता. यावेळी मुंबई पालिकेसह अन्य पालिकातील कामगार उपस्थित होते. मेळाव्यात 'सीआयटीयू'.चे राज्य समिती सदस्य विवेक मोंटेरो आदींनी मार्गदर्शन केले.
No comments:
Post a Comment