मुंबई -‘मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये’, असा संतप्त सवाल सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील एका शेतकऱ्याने रक्ताने पत्र लिहून विचारला आहे. या तालुक्यातील तीन मंडळांतील शेतकऱ्यांना मदतीपासून वगळल्यामुळे त्याने हे पत्र पाठविले असून सर्व शेतकऱ्यांना मदत देण्याची विनंती केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी आतापर्यंत ९५ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तर त्यानंतर सतत झालेल्या पावसामुळे पिके हातची गेली आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातून अतिवृष्टीमुळे १.३१ लाख शेतकऱ्यांचे १.१० लाख हेक्टरचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदतीसाठी १५४ कोटी रुपयांची मदत लागणार आहे. शासनाने ही मदतदेखील जाहीर केली आहे; मात्र सेनगाव तालुक्यात चार मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली नसल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे.
या प्रकारानंतर सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकरी नामदेव पतंगे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहिले आहे. ‘मदतीपासून मंडळातील शेतकऱ्यांना वगळल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. अनेक शेतकरी अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मंडळातील शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यामुळे आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये राहतो’, असा प्रश्न या पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. ‘आपण अधिवेशनात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी घोषणा केली होती, मग हे काय आहे. खासगी फायनान्स कंपन्या शेतकऱ्यांच्या नाकीनाऊ आणत असून आता जगायचे कसे ते सांगा; अन्यथा उर्वरित रक्ताने अभिषेक करून आमचे जीव सोडून देऊ,’ असेही या पत्रात नमूद केले आहे. सदरील पत्र सेनगावच्या तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment