मुंबई - मुंबईच्या पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता विविध प्रकल्प मार्गी लावून पाण्याचे स्त्रोत वाढवण्यावर पालिकेचा भर आहे. मात्र सद्यस्थितीत मुंबईकरांना २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे पुढील काही वर्ष तरी मुंबईकरांना २४ तास पाणी पुरवठ्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणारी मुंबई महापालिका देशातील पहिली महापालिका आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो. मुंबईचा पाणीपुरवठा १४० किलोमीटर अंतरावर होतो. तर धरण क्षेत्र परिसरात राहणाऱ्यांनाही १६० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून हे पाणी पिण्यासाठी व शेती कामासाठी वापरले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबईची वाढती लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांच्या रोजच्या पाणी पुरवठ्याची मागणी वाढते आहे. त्यामुळे विविध आखलेलेल पाण्याचे प्रकल्प मार्गी लावून पाण्याचे स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न पालिकेकडून सुरु आहेत. मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. सत्ताधारी पक्षाकडूनही २४ तास पाण्याचे आश्वासन मुंबईला देण्यात आले होते. सुरुवातीला मुलुंड व वांद्रे पश्चिम परिसरात २४ तास पाणी पुरवठा करण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र मुंबईची भौगोलिक स्थिती लक्षात घेतल्यास संपूर्ण मुंबईला २४ तास पाणी पुरवठा करणे सध्या तरी अशक्य आहे. मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात उंच टॉवर उभे राहत आहेत. तर दुसरीकडे दाटीवाटीने झोपड्याही उभ्या राहत आहेत. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत असून उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडत आहे. वाढीव पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित गारगाई, पिंजाळ व दमणगंगा यांसारखे नवीन जलस्रोत निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत पालिका जल अभियंता खात्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.
मुंबईला ५ हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्याची गरज -
मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईकरांसाठी सध्या किमान ५ हजार दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्याची गरज आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईला प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने सध्या आणखी किमान १ हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबईला प्रस्तावित व अद्यापही रखडलेल्या गारगाई, दमणगंगा व पिंजाळ या नवीन जलस्तोत्राला चालना देणे गरजेचे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
धरणांची सद्यस्थिती!
तानसा तलावामधून दररोज ४५५ द.ल.लि,
- मोडक सागर - ४५५ द.ल.लि.
- मध्य वैतरणामधून - ४५५ द.ल.लि.
- अप्पर वैतरणा - ६४० द.ल.लि.
- भातसामधून - २०२० द.ल.लि.
- विहारमधून - ९० द.ल.लि.
- तुळशीमधून - १८ द.ल.लि.
११ हजार कर्मचारी कार्यरत -
मुबंई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे चालू राहण्यासाठी दररोज सुमारे ११५० अभियंते व ८९५० कामगार व इतर कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.
२५ मेगावॉट वीजनिर्मितीमुळे पैशांची बचत!
तानसा धरणांतून दररोज ४५५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. या धरण क्षेत्रातील रस्त्यांवरील दिवे, कार्यालयातील वीजपुरवठासाठी २०१७ मध्ये २५ मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला. सद्यस्थितीत २५ मेगावॉट वीजनिर्मिती होत असल्याने महिन्याला वीज बिलाचे ५० ते ६० हजार रुपयांची बचत होते, अशी माहिती उप कार्यकारी अभियंता राजेश जोहरे यांनी दिली.
No comments:
Post a Comment