मुंबई - शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिंदे गटानेही अर्ज केल्याने पालिकेसमोर पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने अर्ज केल्यास महिना उलटला तरीही पालिकेकडून अद्याप परवानगीबाबतचा निर्णय झाला नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. परवानगी मिळो वा न मिळो उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणार अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली आहे. मंगळवारी शिवसेनेचे नेते व माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या जी- नॉर्थ येथील कार्यालयात जाऊन परवानगीबाबत अधिका-यांची भेट घेतली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना वैद्य यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात यंदाचा दसरा मेळावा कुणाचा शिवसेनेचा की शिंदे गटाचा यावर राजकीय घमासान सुरु आहे. या मेळाव्यासाठी शिंदे गटानेही अर्ज केला आहे. शिवसेनेने सर्वात आधी पालिकेकडे मेळावा परवानगीसाठी अर्ज केला आहे. या दरम्यान बीकेसीच्या मैदानासाठीही शिवसेना व शिंदे गटाने अर्ज केला होता. येथे शिंदे गटाला एमएमआरडीएने परवानगी दिली आहे. शिवसेनेने मागितलेले मैदान एका कंपनीसाठी आधीच आरक्षित केल्याने शिवसेनेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने दसरा मेळावा शिवाजी पार्कातच होणार अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेने परवानगीसाठी एकदा अर्ज व त्यानंतर स्मरणपत्र असे दोनवेळा अर्ज केले आहे. महिना उलटला तरी पालिकेच्या जी- नॉर्थ कार्यालयाने याबाबत निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने या आधी दोनवेळा भेट घेतली. त्यावेळी यावर विधी विभागाचा अभिप्राय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र अजूनही याबाबत काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मंगळवारी शिवसेना नेते मिलिंद वैद्य यांनी शिष्टमंडळांसह पालिकेच्या अधिका-यांशी भेट घेतली. विधी खात्याकडून आजपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याने कोणत्या गटाला परवानगी द्यायची याबाबत ठरवता येणार नाही. विधी विभागाने अभिप्राय दिल्यानंतर कळवले जाईल असे प्रशासनाक़डून शिष्टमंडळाला सांगण्यात आल्याचे वैद्य यांनी सांगितले. त्यामुळे परवानगी मिळो वा ना मिळो उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी मेळाव्यासाठी शिवसैनिक जमा होतील अशी वैद्य यांनी स्पष्ट केले. आता प्रशासनाने ठरवायचे की परवानगी द्यायची किंवा नाही, आमचा निर्णय ठरला आहे, शिवसेना शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेणारच असेही ते म्हणाले.
राज्य सरकारचा पालिकेवर दबाव -
मेळाव्याला परवानगी मिळू नये यासाठी राज्य सरकारचा पालिकेवर दबाब आहे. एक महिन्यांचा कालावधी झाला तरी यावर कोणताही निर्णय झालेला नाही. शिंदे गटाने बीकेसी साठी परवानगी मागितली होती, त्यांना मिळाली, त्या ठिकाणी त्यांनी पैसेही भरले आहेत. एकाच ठिकाणी दोन गटाने अर्ज केला असता तर त्याचा विचार केला गेला असता. पण आता तोही प्रश्न उरला नाही. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे सांगितले जाते आहे, पण त्याचा इथे काहीही संबंध नाही, असे शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिवाजी पार्क परिसरात सुरक्षा वाढवली -
शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा परवानगी वरून राजकारण तापले आहे. कायदा व सुव्य़वस्था बिघडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरात व पालिकेच्या जी - नॉर्थ कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
विधी विभागाचा अद्याप अभिप्राय नाही-
दसरा मेळाव्याच्या परवानगीचा पेच सोडवण्यासाठी कायदेशीर बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यासाठी जी- नॉर्थ विभागाने विधी विभागाकडे याबाबतचे कागदपत्र पाठवली आहेत. परंतु अद्याप यावर विधी विभागाचा अभिप्राय आला नसल्याचे जी- नॉर्थ विभागाकडून सांगण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment