मुंबई - मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले जाते. मागील वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा त्यामध्ये वाढ करून २२ हजार ५०० रुपये इतका बोनस दिला जाणणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याने मुंबईमधील प्रसार आटोक्यात आला. यासाठी २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोनसच्या रकमेत भरघोस वाढ करून २० हजार इतका बोनस देण्यात आला होता. यंदा पालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियन आणि कृती समितीकडून करण्यात आली होती. पालिका कर्मचारी संघटना कृती समिती आणि आयुक्त असलेले प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्यात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी २० हजार रुपये बोनस देण्यासाठी सकारात्मकता दाखवली. बोनसमध्ये वाढ करून हवी असल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक घ्यावी अशी सूचना आयुक्तांनी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्र्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी संदिप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत २२ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य सेविकांना ९ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे कर्मचारी युनियन कृती समितीचे प्रकाश देवदास यांनी दिली.
No comments:
Post a Comment