मुंबई - मुंबईच्या सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे तयार केले जाणार आहे. दुस-या टप्प्यासाठी पाच हजार कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी खोदले जाणारे चर भरण्यासाठी ३८० कोटी खर्च केले जाणार आहेत. येत्या ऑक्टोबरपासून दुस-या टप्प्यातील सीसीटीव्हीच्या कामाला सुरुवात होईल अशी शक्यता आहे.
मुंबईत २०१९ मध्ये पहिल्या टप्प्यात ५,३६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. दुस-या टप्प्यात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नियोजन करण्यात आले होते. मात्र हा निर्णय रखडला होता. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेस होतो. पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या आपत्कालीन प्रसंगांना तोंड देण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असते. वाहतूककोंडी, सखल भागात साचणारे पाणी, पडझडीच्या घटना आदी आपत्कालीन प्रसंगांमध्ये कॅमेऱ्यांचा मोठा फायदा पालिकेला झाला आहे. यामुळे आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदतकार्य सुरु करणे पालिकेला शक्य होते आहे. राज्य सरकारकडून या आधी ५ हजार कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यात आता आणखी ५ हजार कॅमेरे बसवले जाणार असल्याने सुरक्षिततेच्यादृष्टीने हे महत्वाचे ठरणार आहे.
सीसीटिव्ही बसवताना खोदकाम करावे लागते. हे खोदकाम करताना पडणारे चर भरण्यासाठी कंत्राटदार कंपनीची नियुक्ती केली जाते. हे चर भरण्यासाठी राज्य सरकारने सदर कंपनीस ३०० कोटी रुपये रक्कम दिली होती. दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने चर भरण्यासाठीचा भार पालिकेवर टाकला आहे. मुंबई पालिकेकडून ही जबाबदारी पेलण्याची भूमिका घेण्यात आली होती. त्यानुसार चर भरण्यासाठी पालिका ३८० कोटी रुपये खर्च करणार असून या खर्चाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबईत लवकरच ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता पालिका प्रशासनाच्या अधिका-याने व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment