मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर जोरदार पावसामुळे होणारे खड्डे भरून काढण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने जिओपॉलिमर आणि रॅपिड हार्डनिंग काँक्रिट तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खड्डे भरण्यासाठी येत्या सुमारे १५ महिने कालावधीकरिता महानगरपालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहेत. काम पूर्ण झाल्यावर ५० टक्के तर हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुंबई महानगरात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रामुख्याने डांबरी रस्ते खड्डेमय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. हे खड्डे तात्काळ बुजवण्याची कार्यवाही केली जात असली तरी, सततचा जोरदार पाऊस आणि सोबतीला वाहतुकीचा ताण यामुळे कोल्डमिक्स सारख्या पारंपरिक तंत्रज्ञानाच्या वापरावरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे खड्डे भरल्यानंतरही काही कालावधीत पुन्हा खड्डे तयार होत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी नुकताच विविध ठिकाणी रस्ते पाहणी दौरा केल्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी नवीन आणि प्रगत स्वरुपाच्या अभियांत्रिकी पद्धतींची चाचपणी करावी, असे निर्देश रस्ते विभागाला दिले होते. त्यानुसार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांच्या देखरेखीखाली रस्ते विभागाने पूर्व मुक्त मार्गाच्या खाली दयाशंकर चौक, मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता तसेच आणिक-वडाळा मार्गावर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती. यामध्ये रॅपिड हार्डिंग काँक्रिट, एम ६० काँक्रिट भरून त्यावर स्टील प्लेट अंथरणे, जिओ पॉलिमर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक या चार पद्धतींचे प्रायोगिक तत्त्वावर सादरीकरण करण्यात आले होते. या चारही पद्धतींच्या प्रात्यक्षिकाची अतिरिक्त आयुक्त वेलरासू यांनी पाहणी केली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या रस्ते विभागाची आढावा बैठक देखील घेण्यात आली. रस्त्यांवरील खड्डे लवकरात लवकर भरून, वाहतूक सुरळीत राहण्यासाठी कायमस्वरूपी चांगला पर्याय अमलात आणावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री दिले होते. या पार्श्वभूमीवर, प्रायोगिक चाचणीमध्ये निदर्शनास आलेल्या निष्कर्षानुसार महानगरपालिका प्रशासनाने रॅपिड हार्डनिंग काँक्रीट आणि जिओ पॉलिमर या दोन नवीन व अभिनव पद्धतींचा उपयोग करून रस्त्यांवरील खड्डे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे हे तिन्ही विभाग मिळून सुमारे ५ कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या एकूण पाच निविदा काढण्यात आल्या आहेत.
कंत्राटदाराला काम पूर्ण झाल्यानंतरच ५० टक्के रक्कम -
कार्यादेश दिल्यापासून पुढील पंधरा महिने कालावधीसाठी या निविदाद्वारे कंत्राटदार नियुक्त केले जाणार आहे. खड्डे भरण्याचा पंधरा महिन्यांचा कालावधी संपल्यानंतर त्यापुढील पंधरा महिने हमी कालावधी लागू राहणार आहे. विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर ५० टक्के तर हमी कालावधी पूर्ण झाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कम कंत्राटदारास दिली जाईल. तशी तरतूद या निविदांमध्ये करण्यात आली आहे. सध्या प्रचलित पद्धतीमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर ८० टक्के तर हमी कालावधीत २० टक्के रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते.
No comments:
Post a Comment