मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रध्वज अभिमानाने आणि डौलाने फडकवत मुंबईकरांनी जल्लोष साजरा केला. अवघी मुंबई तिरंगी झेंड्यांनी मुंबई सजली होती. झोपड पट्ट्या, चाळी, इमारतींतील घराघरांवर, सरकारी कार्यालयांवर, वाहनांवर तिरंगी झेंडे फडकले. गल्लोगल्ली, चौका चौकातून प्रभात फे-यांनी आणि 'भारतमाता की जय' या घोषणांनी मुंबई दणाणली. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राजभवनावर राज्यपालांनी, पालिका मुख्यालयावर पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी ध्वजारोहण केले. सरकारी कार्यालये, निमशासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संस्था, झोपडपट्ट्या, गृहनिर्माण संस्थांनीही सकाळी ध्वजारोहण केले. देशभक्तीपर गीतांनी वातावरण भारून गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगर पालिकेची इमारतींसह नरीमन पॉइंट येथील क्वीन नेकलेस आणि त्या लगतच्या इमारती तिरंग्याच्या विद्युत रोषणाईने झळाळून गेली होती. या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी झाली होती. या ठिकाणचे सौंदर्य डोळ्यात आणि कॅमे-यात साठविण्यासाठी विविध भागातील नागरिक आले होते. सलग सुट्ट्या आल्याने जीवाची मुंबई करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे रस्ते वाहतूकीची कोंडीही झाली होती. तसेच लोकलही गर्दीने तुडूंब भरून जात होत्या. रस्त्यांतील दुतर्फा वाहनांवर झेंडे असल्याने झेंड्यांमुळे रस्ते फुलून दिसत होते.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गो-हे यांनी विधानभवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण केले. उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या हस्ते, शिवसेना भवनाजवळ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुंबई महानगर पालिकेवर दरवर्षी महापौरांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र सद्या महापालिका बरखास्त झाल्याने पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ध्वजारोहण केले.
विविध संस्था, संघटनांनी झोपडपट्या तसेच आदिवासी पाड्यात जावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, रमाबाई कॉलनी आदी झोपडपट्टी भागात हर घर संविधान साक्षर मोहिमेचा आढावा घेवून अमृत महोत्सवा निमित्ताने ७५ वर्षाचा लेखाजोखा मांडत विविध उपक्रम राबविले. स्वयंसेवी संस्था, संघटनांनी मुंबईच्या चौका- चौकात पथनाट्य, जलसा आदी जनजागृतीपर कार्यक्रम केले. या कार्यक्रमांना मुंबईकरांनी प्रतिसाद देत सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment