मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पुन्हा आक्रमक झाली आहे. काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तल खाना आधुनिकीकरणाच्या ४०० कोटीच्या कंत्राटातील त्रूटी बाहेर आल्याने हे कंत्राट रद्द झाले. मात्र सल्लागाराने संबंधित कंत्राटदाराला निविदा आधीच कागदपत्रे पुरवली त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे सांगत भाजपने हे प्रकरण आता पुन्हा लावून धरले आहे. संबंधित सल्लागारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपने पालिका आयुक्तांकडे केली असल्याची माहिती भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी देवनार कत्तल खान्याच्या आधुनिकरणासाठी ४०० कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी पालिकेने निविदा काढल्या होत्या. मात्र भाजपने या निविदेतील त्रूटी बाहेर काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. भाजपने हे प्रकरण लावून धरल्याने प्रशासनाने हे कंत्राट रद्द केले. यामधील गंभीर बाब म्हणजे या कंत्राटातील सल्लागाराने निविदा निघण्यापूर्वीच संबंधित कंत्राटाची काही कागदपत्रे या निविदेत भाग घेणाऱ्या कंत्राटदारांना पुरविली होती. सल्लागार व कंत्राटदार यांचे संगनमत होते व त्यामधूनच निविदा भरण्या संदर्भात ही कागदपत्रे दिली गेली होती, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. देवनार आधुनिकीकरण निविदेतील सल्लागाराला दुस-या एका प्रकरणात अशाच प्रकारे संगनमत करून निविदा भरण्याच्या प्रकाराबाबत सीसीआय या यंत्रणेने १.५२ कोटी रुपये दंडात्मक कारवाई केली होती. अशा दंडात्मक कारवाई झालेल्या सल्लागार- कंत्राटदाराकडून मुंबई महापालिकेने लेखी खुलासा घेणे नियमानुसार आवश्यक होते. मात्र संबंधित सल्लागार- कंत्राटदाराराने अशा प्रकाराचा खुलासा मुंबई महापालिका प्रशासनास सादर केलेला नाही. ही गंभीर बाब असतानाही मुंबई महापालिकेने सल्लागाराला कारणे दाखवा नोटीस देण्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई केलेली नाही. या प्रकरणी भाजप पुन्हा आक्रमक झाली असून सल्लागार - कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विविध मुद्द्यावर सक्रीय झाल्याचे दिसते आहे.
No comments:
Post a Comment