मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षानंतर ढाक्कुमाक्कुम ढाक्कुमाक्कुम डिजेच्या तालावर थिरकत थरावर थर मानवी मनोरे रचून मुंबईत शुक्रवारी विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आली. गोविंदा आला रे आलाचा ललकार, तर काही ठिकाणी लेझीम पथकाचा ताल अशा जल्लोषात मुंबईत दहिहंडीचा उत्साह पार पडला. अनेक ठिकाणी चित्तथराराक पाच, सहा ९ ते १० थरांवर थर मानवी मनोरे रचले. यंदा डीजे व इतर निर्बंध हटवल्याने बँजो आणि ताशांच्या कडकडाटात जल्लोषपूर्ण वातावरणात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्ष उत्सवांवर निर्बंध होते. हे निर्बंध हटवल्याने यंदा मोठ्या उत्साहात दहिहंडी साजरी करण्यात आली. मुंबई भरात गोविंदांचा उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, जोगेश्वरी आदी ठिकाणी एकावर एक असे चित्तथराराक मानवी मनोरे रचून हंडी फोडण्या प्रयत्न झाला. अनेक ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय केली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात राजकीय नेत्यांचा सहभाग लक्ष वेधून घेणारा होता. उत्सवासाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीच्या मार्गांवर निर्बंध घालण्यात आले होते. दादरमध्ये काही मार्ग बंद करण्यात आले होते. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या राखी जाधव आणि दुर्गा परमेश्वरी मंदिर यांच्या संयुक्तपणे दहिहंडी उभारण्यात आली. येथे महिला आणि पुरुषांच्या पथकासाठी एक एक लाखाची दहा बक्षिसे देण्यात आली. तसेच सलामी देणा-य़ा पथकांना पाच हजारांपासून ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम देण्यात आली. तसेच घाटकोपर पश्चिम येथे राम कदम यांच्या दहिहंडीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार मनोज कोटक आदी नेते उपस्थित राहिले होते. यावेळी खासदार किरीट सोमय्या यांनी तीन थराची प्रातिनिधीक दहिहंडी फोडली. भांडुपमधील मनसेच्या दहीहंडीला ९ थर लावून जय जवान गोविंदा पथकाने सलामी दिली.
मागाठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थिर होते. गिरगावमध्ये मनसेच्या दहीहंडीला राष्ट्र चेतन महिला गोविंदा पथकाने पाच थरांची सलामी दिली. तर वरळीतील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचेने नेते आशिष शेलार यांनी आयोजित केलेल्या दहिहंडीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित होते. तर दुसरीकडे वरळीतच शिवसेनेने दहिहंडी उभारली होती. या दहिहंडीसाठी शिवसेनेचे युवा नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार सचिन अहिर आदी शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
दादर येथील आयडियल दहिहंडी २५ वर्षांपासून आयोजित केली जाते. ही दहिहंडी महिलांच्या पथकांनी फोडली. गल्लो गल्ली छोट्या मोठ्या दहिहंडी उभारल्या होत्या. त्या फोडण्यासाठी पथकांची चढाओढ सुरू होती. शेकडो गाड्यांमधून गोविदां पथके दहिहंडी फोडत पुढे निघत होते. लाऊड स्पिकर, ढोल, ताशे यांचा दणदणाट गोविदांचा उत्साह वाढवित होता.
No comments:
Post a Comment