खड्डे बुझवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर तंत्रज्ञानाची चाचपणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2022

खड्डे बुझवण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर तंत्रज्ञानाची चाचपणी



मुंबई - मुंबईतील रस्त्यावर खड्डे बुझवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. कोणत्या तंत्रज्ञानाची चाचपणी करता येईल या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने प्रात्यक्षिक केले. त्यामध्ये चार पद्धतीच्या तंत्रज्ञानाने खड्डे बुझवण्याचे तंत्रज्ञान मुंबई महानगरपालिकेकडून दाखवण्यात आले. त्यामध्ये सिमेंट कॉंक्रिट रोड आणि डांबरी (अस्फाल्ट) रोडवरील रस्ते बुझवण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरून प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यामध्ये जिओ पॉलिमर, पेव्हर ब्लॉक, एम ६०० आणि रॅपिड हार्डनिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश होता.

पावसाळ्यात मुंबईतील रस्ते खड्डेमय होतात. दरवर्षीची ही समस्या अद्याप कायम आहे. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉंक्रिट रोडचे काम हाती घेण्यात येत आहे. अनेकदा सिमेंटचा संपूर्ण ब्लॉक दुरूस्त करणे खर्चाचे तसेच वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामध्ये वाहतूकही मोठ्या प्रमाणात थांबवाली लागते. यासाठी जिओ पॉलिमरचा वापर केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून २ इंच ते ४ इंचापर्यंतचे खड्डे बुझवण्यासाठी हे मटेरिअल उपयुक्त आहे. त्यामध्ये सीसी रोडला पडलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करणे शक्य आहे. यासाठी ५ हजार रूपये प्रति चौरस मीटर इतका तंत्रज्ञानाचा खर्च असणार आहे. मुंबईतील आणिक आगार येथे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. या आणिक वडाळा मार्गावरील या रस्त्याचे काम करण्यात येत आहे. जिओ पॉलिमर हे पेटंट असणारे मटेरिअल असून त्यामध्ये एडेसिव्हचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे अवघ्या दोन तासांमध्ये त्या मार्गावरील वाहतूक सुरू करणे शक्य होते.

काय आहेत तंत्रज्ञान -
पेव्हर ब्लॉक -
डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुझवण्यासाठी सर्वात स्वस्त अशा पेव्हर ब्लॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान अवघ्या ५०० रूपये चौरस मीटर इतके स्वस्त आहे. महत्वाचे म्हणजे चांगल्या दर्जाचे पेव्हर ब्लॉक वापरून दीर्घकाळ वापरात येणारे हे तंत्रज्ञान आहे. पेव्हर ब्लॉकला आयुष्यमान अधिक आहे. तसेच अवजड वाहनांच्या रस्त्यावरही हे उपयुक्त ठरणारे असे तंत्रज्ञान आहे.

एम ६०० तंत्रज्ञान -
एकप्रकारच्या सिमेंटचा वापर या तंत्रज्ञानासाठी होतो. या प्रकारात एम ६०० हे सिमेंटच्या रस्त्यावरील खड्डे बुझवण्यासाठी वापरण्यात आले. हे सिमेंट वापरून खड्डे बुझवण्यासाठी सात दिवस इतका कालावधी लागतो.

- रॅपिड हार्डनिंग
पॉलिमर, कॉंक्रिटचा वापर करून खड्डे बुझवण्याचे हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानात खड्डा बुझवण्यासाठी सात ते आठ तासांचा कालावधी लागतो. रॅपिड हार्डनिंगमुळे कोल्डमिक्सच्या तुलनेत हे मटेरिअल घट्ट पकड घेते. परंतु तुलनेत हा पर्याय खर्चिक आहे. या पर्यायात प्रति चौरस मीटरसाठी २३ हजार रूपये इतका खर्च येतो. परंतु इतर तीन तंत्रज्ञानाच्या तुलनेत हा महागडा पर्याय आहे.

रस्त्यांवर चार तंत्रज्ञानाचा प्रयोग -
खड्डे बुजवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. एकूण चार तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. आणिक वडाळा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या रस्त्यावर वाहन चालकांना दिलासा देण्यासाठीच आम्ही चार वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. यामध्ये यशस्वी ठरणारे तंत्रज्ञान येत्या काळात वापरण्यात येईल. या तंत्रज्ञानात कोणते तंत्रज्ञान यशस्वी ठरते हे पाहणे महत्वाचे ठरेल. त्यानुसार यशस्वी तंत्रज्ञान मुंबईतील रस्त्यांवर वापरले जाणार आहे.
उल्हास महाले, उपायुक्त, मुंबई महानगरपालिका

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad