मुंबई - मुंबई महापालिकेने मुंबईकरांना योग प्रशिक्षण मिळण्यासाठी ‘शिव योग’ केंद्र सुरु केले आहे. या केंद्रांना प्रतिसाद वाढत चालला आहे. मुंबईतील सर्व प्रभागात १४९ ठिकाणी शिवयोग केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांना अल्पावधीतच मुंबईकरांकडून प्रतिसाद वाढतो आहे. योग प्रशिक्षण संस्था, योग प्रशिक्षकांच्या साहाय्याने शिव योग केंद्रे चालविली जात आहेत.
मुंबई महापालिकेच्या शिवयोग केंद्र योजनेंतर्गत प्रत्येक प्रभागात योग शिकविण्यासाठी प्रशिक्षित योग केंद्रांची निवड केली जात आहे. पालिकेमार्फत प्रथमच या पद्धतीने योग प्रशिक्षणाचे धडे गिरविले जात आहेत. मुंबईकरांना विनामूल्य स्तरावर योग शिकविण्यासाठी पालिकेकडून जागा उपलब्ध केली जात आहे. मुंबईत एकूण २३६ प्रभागांपैकी १९१ ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. १९१ पैकी १४९ ठिकाणी प्रत्यक्ष योग प्रशिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत. अजूनही ४५ प्रभागातील संभाव्य ठिकाणांची निवड अद्याप झालेली नाही. त्यामुळे अजून ४८ ठिकाणी शिव योग केंद्र सुरू होणे बाकी आहे. वाढत्या प्रतिसादामुळे लवकरच उर्वरित ठिकाणीही योग केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.
मुंबई पालिकेने शिव योग केंद्र चालविण्यासाठी प्रशिक्षक, प्रशिक्षण संस्थानी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यात सहभागी होण्यासाठी योग प्रशिक्षण संस्था, योग प्रशिक्षकांनी विभागातील सहाय्यक आयुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन पालिकेने केले होते. त्यानुसार विविध प्रभागात इच्छुक संस्था, प्रशिक्षकांचा प्रतिसाद मिळत असल्याचे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
निकषानुसार निवड -
शिव योग केंद्रावर प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकास प्रत्येक सत्रामागे एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. योग संस्था वा प्रशिक्षित योग शिक्षकांची निवड करण्यासाठी पालिकेने काही निकष तयार केले आहेत. त्यात योग संस्थेस किमान दोन वर्षे योग प्रमाणन मंडळ किंवा इंडियन योग असोसिएशनमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ही संस्था प्रशिक्षित योग प्रशिक्षक पुरविण्याची क्षमता आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment