मुंबई - मुंबई महानगरातील दुकाने व आस्थापना यांच्या मराठी पाट्य़ांच्या अंमलबजावणीसाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. पण व्यापारी संघटनांच्या मुदत वाढीच्या मागणीनुसार आता येत्या ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय़ मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अवघ्या ३५ टक्के इतक्या मराठी पाट्यांची अंमलबजावणी आतापर्यंत झाली आहे.
मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी पाट्या बंधनकारक करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेने तयारी केली आहे. मात्र व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे तसेच मटेरिअल महागले असल्याची कारणे पालिकेच्या बैठकीत दिली होती. त्यामुळेच अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे सांगितले होते. तसेच अंमलबजावणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणीही केली होती. याआधी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशांनुसार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या विविध व्यापारी संघटनांनी नामफलक सुधारणा करण्यास मुदतवाढ मिळण्यासाठी विनंती केली होती. या अनुषंगाने नामफलक सुधारणा करण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यास महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे. यानुसार आता नामफलक सुधारणा करण्यास ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती दुकाने व आस्थापना खात्याच्या प्रमुख अधिकारी सुनिता जोशी यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment