मुंबई - मुंबईत मुसळधार पावसांत पूरस्थिती निर्माण होऊन अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांसाठी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून लवकरच मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन लोकल ट्रेन ठप्प झाल्यास प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी हे मॉक ड्रिल घेतले जाणार आहे. यासाठी मंगळवारी आपत्कालीन विभागाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक विभागातील नोडल अधिकाऱ्याला मदतकार्य पोहचवण्याच्या अनुषंगाने सूचनाही देण्यात आल्या.
पूरात अडकलेल्या लोकल ट्रेन प्रवाशांच्या मदतीसाठी मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील २४ विभागांमध्ये एक नोडल अधिकारी अधिकारी नियुक्त केला आहे. हा अधिकारी अभियंता दर्जाचा असणार आहे. प्रवाशांना महापालिकेच्या निवाऱ्याच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देतानाच वैद्यकीय सुविधा आणि खाण्यापिण्याच्या सुविधा देण्यात येतील. आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देताना अशा प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या उदिष्टाने मॉक ड्रिल करण्याचे आदेश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्यानुसार निर्णय घेण्यात आला आहे.
पावसाळ्यात रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच प्रवाशांना योग्य मदत मिळावी यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याच्या सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्कालीन कक्षाला दिलेल्या भेटीतही दिले होते. अशा आपत्कालीन परिस्थितीत लोकल ट्रेन सेवा विस्कळीत झाल्यास प्रवाशांना आपल्या नजिकच्या परिसरात पोहचता यावे यासाठी एसटी आणि बसेसची पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश तसेच सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) बाबत कार्यवाही करण्याचेही आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पूरस्थितीसारख्या संभाव्य परिस्थितीत नागरिकांच्या सुविधेसाठी ४०० जादा बसेस वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडण्याची बेस्टने तयारी केली आहे. तसेच ११ जादा बसेसची सुविधा एसटी महामंडळाकडूनही करून देण्यात आली आहे.
विभागीय पातळीवर मॉक ड्रील -
मुंबई महापालिका क्षेत्रात पूराच्या पाण्यात अडकलेल्या लोकल ट्रेनच्या प्रवाशांना तात्पुरत्या निवाऱ्याच्या ठिकाणी स्थलांतरीत करणे हे प्रमुख काम विभागवार अशा नोडल अधिकाऱ्यांचे असेल. तसेच अशा प्रवाशांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे आणि नाष्ट्याची व्यवस्था करून देण्यासाठी मॉक ड्रील करण्यात येणार आहे. हे मॉकड्रील आठवड्य़ाभरात मुंबईतील विविध विभागात होण्याची शक्यता आहे. विभागीय पातळीवर हे मॉकड्रिल घेण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
No comments:
Post a Comment