पालिका रुग्णालयात चार वर्षाच्या बालकावर "कॉक्लिअर इम्प्लान्ट" शस्त्रक्रिया - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2022

पालिका रुग्णालयात चार वर्षाच्या बालकावर "कॉक्लिअर इम्प्लान्ट" शस्त्रक्रिया



मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात एका ४ वर्ष वयाच्या व जन्मतः कर्णबधीर असलेल्या बालकावर कॉक्लिअर इम्प्लान्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे. विशेष म्हणजे महागड्या स्वरुपाच्या या शस्त्रक्रियेसाठी लागणारे उपकरण व इतर वैद्यकीय खर्च समाजसेवी संस्थांनी उचलला असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, कॉक्लिअर इम्प्लान्ट झालेल्या बालकाची प्रकृती स्थिर असून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल बालकाच्या आई-वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

कॉक्लिअर इम्प्लान्ट ही शस्त्रक्रिया कमी वयाच्या मूक-बधीर/ कर्णबधीर रुग्णांसाठी वरदान आहे. 'कॉक्लिअर' हे एक लहान स्वरुपाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. ते बसविल्यामुळे लहान मुलांमधील कर्णबधिरता दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ८ ते १० लाख रुपयांपर्यंत होवू शकतो व त्यासाठी निष्णात वैद्यकीय शल्यचिकित्सकांची, तज्ज्ञांची आवश्यकता असते.

महानगरपालिकेच्या कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील डी.एन.बी. शिक्षक डॉ. राजेश यादव आणि त्यांच्या सहका-यांनी कॉक्लिअर इम्प्लान्टचे महत्त्व जाणून या शस्त्रक्रियासाठी विशेष प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या गरीब एका शेतकरी कुटुंबातील फळविक्रेत्याचा चार वर्षाचा मुलगा जन्मत: मूक-बधीर आहे. या बालकाच्या उपचारांकरीता त्याच्या आई-वडिलांनी खूप ठिकाणी प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या अडचणींमुळे मोठ्या रुग्णालयांत जाणे परवडत नसल्याने त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारांकरीता या बालकाला आणले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी कॉक्लिअर इम्प्लान्ट करण्याविषयी सुचविले.

मात्र, या शस्त्रक्रियेचा उपकरण व इतर खर्च देखील परवडणार नसल्याचे या कुटुंबाने सांगितले. त्यांची एकूणच परिस्थिती लक्षात घेता आणि या लहानग्याला श्रवणशक्ती देण्याचा निर्धार करुन रुग्णालयातील मानसेवी तज्ज्ञ डॉ. धोंड, नोबल फाऊंडेशन, डॉ. भरत जोबनपुत्रा व एड्स कॉम्बॅट यांनी मिळून आर्थिक पाठबळ उभे केले. त्यानंतर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात कॉक्लिअर इम्प्लान्टची पहिली शस्त्रक्रिया सोमवारी, ८ जुलैला रोजी यशस्वीरित्या पार पडली. महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांत प्रथमच अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad