राज्यात ८ ते १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 July 2022

राज्यात ८ ते १० दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा



मुंबई - दोन वर्षांपूर्वी मुंबईसह राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि रक्तदान करणाऱ्यांनी रक्तदान करण्याकडे पाठ फिरवली आहे. मुंबईत दररोज ५०० ते एक हजार युनिट रक्ताची गरज भासते, तर राज्यात ३ ते ५ हजार युनिट रक्ताची गरज भासते. मात्र सध्यस्थितीत रक्तपेढ्यांमध्ये ४४ हजार ७२ युनिट रक्त उपलब्ध आहे. हा रक्तसाठा पुढील ८ ते १० दिवस पुरेल इतकाच आहे.

रक्तदान सर्वांत श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. मुंबईसह राज्यभरात राज्य रक्त संक्रमण परिषद मान्यताप्राप्त रक्तपेढ्या, पालिका, सामाजिक संस्था, मंडळे यांच्याकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करत गरजुंना रक्ताचा पुरवठा करण्यात येतो. मात्र मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाली. त्यामुळे रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. रक्तदान शिबीर आयोजित करत रक्तदान करावे, असे आवाहन असून लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संचालक डॉ. साधना तायडे यांनी केले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील लोकसंख्या ११ कोटी २३ लाख ७४ हजार ३३३ होती. लोकसंख्येच्या तुलनेत २०२० मध्ये रक्तदान शिबिरांतून १५ लाख ४६ हजार ८०५ युनिट रक्त जमा झाले होते. तर २०२१ मध्ये आयोजित रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून १६ लाख ७३ हजार ९४७ युनिट रक्त जमा झाले होते. लोकसंख्येच्या तुलनेत रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांची संख्या फारच कमी असून रक्तदान करण्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे आणि रक्तदान करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. तायडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad