मुंबई - सततच्या पावसामुळे गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागपूर विभागात-गडचिरोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २० मिमी. एवढा सरासरी पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता व वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत तर गोदावरी नदी व इंद्रावती नदी या धोका पातळीच्या वर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या १० हजार ६०६ व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून त्यांच्यासाठी ३५ मदत केंद्रे उघडण्यात आली आहेत.
कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहत आहे. लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले आहेत.
गोदावरी व प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परशुराम घाटात एकेरी वाहतूक -
कोंकण विभागात -रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०.१ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही, मात्र जिल्ह्यातील खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळी वरून वाहत आहेत. वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा दिनांक ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ वा. पासून ते सायंकाळी ७. वा. पर्यंत अवजड वाहनाची एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली असून, सायंकाळी ७. वा. ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणारा अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्य:स्थिती -
राज्यात ७३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली असून आतापर्यंत ११ हजार ८३६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. आतापर्यंत अति वृष्टीमुळे १०४ नगरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत.
राज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या तैनात -
मुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर-१, रायगड-महाड-१, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण-२, कोल्हापूर-२, सातारा-१, सिंधुदुर्ग-१, गडचिरोली -१ अशा राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली -१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या कायमस्वरूपी ९ तुकड्या -
मुंबई -३, पुणे-२ अशा एकूण ५ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), तसेच धुळे-२, नागपूर-२ अशा एकूण ४ टीम राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या कायमस्वरूपी तुकड्या आहेत. राज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी ११ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिध्दीसाठी देण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment