अमरावती - मेळघाटमध्ये दुषित पाणी पिल्यामुळे आजारी पडलेल्या नागरिकांना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास खासगी रूग्णालयात दाखल करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिका-यांना दूरध्वनीद्वारे दिले. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून दिली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातील पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण झाली. या दुर्घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ दखल घेत दिल्ली दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी तत्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला. दुषित पाण्याने बाधा झालेल्या व्यक्तींना तातडीने चांगले उपचार मिळवून द्यावेत. आवश्यक असल्यास त्यांना खाजगी, मोठ्या रुग्णालयात दाखल करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
दुषित पाण्याने बाधा झालेल्या नागरिकांवर उपचार सुरू असून, आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन सतत संपर्कात असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी दिली. यावेळी या सर्वांना योग्य उपचार मिळावेत, तसेच यापुढे हानी टाळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत मिळवून दिली जाईल. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
No comments:
Post a Comment