मुंबई - कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी टास्क फोर्सने राज्य सरकारला महत्त्वाच्या शिफारसी केल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणांसह गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याची शिफारस टास्क फोर्सने केली आहे. मात्र, ही शिफारस मास्क सक्ती नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सोमवारी रात्री सरकारच्या टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने विविध मुद्यांवर चर्चा झाली. रुग्णालये, चित्रपटगृहे, बंदिस्त सभागृहे, मॉल्स या ठिकाणीही मास्कचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या कोरोना रुग्णांमध्ये ताप हे प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे सर्व डॉक्टरांनी ९९ अंश किंवा त्याहून अधिक ताप असलेल्या रुग्णांची योग्य दखल घेतली पाहिजे असेही टास्क फोर्सने आपल्या शिफारसीत म्हटले आहे. आरटीपीसीआर चाचणी केली पाहिजे. संबंधित व्यक्तीची ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर जवळच्या संपर्कातील लोकांची चाचणी केली पाहिजे, असेही टास्क फोर्सने म्हटले आहे.
कोरोनाबाधित व्यक्तींना होम क्वारंटाईन गरजेचे असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. त्याशिवाय, ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, कोमॉर्बिड आणि लसीकरण न केलेल्यांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment