मुंबई - मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्ट मार्ग व एस.व्ही. रोड या जंक्शनवरील उड्डाण पुलाच्या लोकापर्ण कार्यक्रमात शनिवारी शिवसेना, भाजपमध्ये श्रेयवाद समोर आला. या पुलाच्या लोकार्पण सोहळ्याआधीच दोन्ही पक्षाचे कार्येकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत आमने - सामने आले. भाजपने उड्डाणपुला जवळच आंदोलन केले. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीत उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उड्डाण पुलाचे लोकार्पण केले. अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग बांधलेल्या या पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी बांधकामा दरम्यान घेण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बोरीवलीतील आर. एम. भट्टड मार्गावरील या उ्डाण पुलाचा लोकार्पण कार्यक्रम सोमवारी उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता ठरला होता. मात्र त्याआधीच भाजप व शिवसेनेचे कार्येकर्ते मोठ्या प्रमाणात कार्यक्रमास जमले होते. कार्यक्रमाच्या काही वेळ आधीच जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला होता. भाजपने पुलाच्या बाजूलाच आंदोलनही केले. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उड्डाणपुलावरून दोन्ही पक्षात श्रेयाची लढाई समोर आली आहे.
आर. एम. भट्टड मार्गावर बोरिवली (पश्चिम) मधील लिंक रोड ते फिल्डमार्शल करिअप्पा उड्डाणपुलापर्यंत बांधण्यात आलेला हा उड्डाणपूल प्रामुख्याने लिंक रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग म्हणजेच वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे यांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या उड्डाणपुलामुळे शामाप्रसाद मुखर्जी चौक, कल्पना चावला चौक, साईबाबा नगर, राजेंद्र नगर आणि जवळपासच्या भागातील वाहतुकीला मदत होणार आहे. स्वामी विवेकानंद मार्ग जंक्शन आणि कल्पना चावला चौक या दोन महत्त्वाच्या जंक्शनवरुन हा पूल विस्तारित झाला असल्याने वाहतुकीचा वेग तर वाढणार आहेच सोबत प्रवासाच्या वेळेतही बचत होणार आहे.
उड्डाण पुलाचे वैशिष्ट्ये -
सुमारे ९३७ मीटर लांब अंतराच्या या उड्डाणपुलावर पूर्व-पश्चिम आणि पश्चिम-पूर्व या दोन्ही बाजूने प्रत्येकी दोन अशा एकूण चार मार्गिका आहेत. कंपोसिट सेक्शन तंत्रज्ञान वापरून व एक स्तंभ पद्धतीने बांधलेल्या या उड्डाण पुलावर अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून पृष्ठभाग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पुलावरून जाणारी वाहने विशेषतः दुचाकी घसरणार नाहीत, याची काळजी घेतली गेली आहे. सदर उड्डाणपुलासाठी १३ हजार ३४७ घन मीटर काँक्रिट, २ हजार ९०० मेट्रिक टन रिइन्फोर्समेंट स्टील, तर ४ हजार १८६ स्ट्रक्चरल स्टील वापरण्यात आले आहे. या प्रकल्पावर सुमारे १७३ कोटी रुपये खर्च झाला आहे.
No comments:
Post a Comment