मुंबई - पावसाळ्याला सुरुवात झाली असून पालिकेची यंत्रणा पावसाळ्यासाठी सज्ज असल्याची ग्वाही मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली असली तरी मुंबईत अन्य ठिकाणांच्या हद्दीतील ३३ ठिकाणी यावर्षीही पाणी तुंबण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे या ठिकाणी पूरस्थिती कमी करण्याच्या उपाययोजना झालेल्या नसून यांपैकी बहुतांश ठिकाणेही पश्चिम उपनगरातील आहेत.
मुंबईत दरवर्षी पावसाचे पाणी तुंबल्याने तुंबई झाल्याचे दिसून येते. त्यामुळे महापालिका व पर्यायाने सत्ताधारी शिवसेनेला टीकेला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून पालिकेने पाणी तुंबणारी ठिकाणे कमी करण्यासाठी विविध कामे हाती घेतली. त्याअंतर्गत नाल्यांची रुंदी वाढवणे, बांधकाम करणे अशी कामे पालिकेचे कर्मचारी करत आहेत. तब्बल ८०० कोटींची ८० कामे मुंबईत सध्या सुरू असून त्यापैकी पश्चिम उपनगरात सर्वाधिक ५० कामे प्रगतिपथावर आहेत.
गेल्या पावसाळ्यात मुंबईत एकूण ३८६ पूरप्रवण क्षेत्रे आढळली. त्यानुसार गेल्या वर्षभरात २८२ ठिकाणे हाताळण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तर उर्वरित १०४ ठिकाणी अद्याप उपाययोजना करण्याचे बाकी आहे. यांपैकी ३३ ठिकाणे अन्य प्राधिकरणांच्या हद्दीत आहेत. त्या ठिकाणी उपाययोजना होत नाहीत, तोपर्यंत पाणी साचण्याचा धोका कायम असेल.
दरम्यान, एमएमआरडीए, मध्य, पश्चिम रेल्वे, विमानतळ प्राधिकरण यांच्या हद्दीतील ही ठिकाणे असून पालिकेने यांना सूचना दिल्या असल्या तरी या प्राधिकरणांकडे पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी खास पर्जन्य जलवाहिन्या खाते नाही. तसेच मनुष्यबळाचाही अभाव असल्याने ही कामे रखडण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
No comments:
Post a Comment