मुंबई - मुंबईत कोरोना आटोक्यात आल्यानंतर निर्बंध हटवण्यात आले. फेब्रुवारीनंतर रुग्णसंख्या घटू लागली. मात्र मे अखेरपासून कोरोनाने पुन्हा डोकेवर काढल्याने चिंता वाढली आहे. फेब्रुवारीत ३० ते ३५ वर असलेली रुग्णसंख्या आता सुमारे दोन हजाराच्या घरात गेली आहे. तर दुसरीकडे रुग्ण दुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर जवळपास सात पट्टीने खाली घसरला आहे. त्यामुळे कोरोना फोफावत असल्याने मुंबईकरांची चिंता वाढते आहे.
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर रुग्णसंख्या झपाट्य़ाने वाढली. त्यामुळे पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन लावण्यात आले. रुग्णसंख्या तब्बल ११ हजारावर पोहचल्याने यंत्रणेसमोर आव्हान उभे राहिले. मात्र प्रभावी उपायोजना, उपचार पद्धती, नियमांची कडक अंमलबजावणी, संशयित रुग्णांचा युद्धपातळीवर शोध, नियमित हेल्थ कॅम्प, लसीकरण मोहिम आदी प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे कोरोनाच्या तीन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले. गेल्या फेब्रुवारीनंतर मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली. त्यामुळे निर्बंधही हटवण्यात आले. सर्व व्यवहार सुरळीत झाले. यावेळी रोजची रुग्णसंख्या ३० ते ३५ वर आली. त्यानंतर रुग्णसंख्या ७० वर स्थिर राहिली. यावेळी रुग्ण दुपटीचा कालावधीही वाढत गेला. मात्र मे अखेरनंतर आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. रोजची रुग्णसंख्या दोन हजारच्या जवळपास पोहचली आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही मागील १८ दिवसांत ३९७३ वरून ५६१ दिवसांवर म्हणजे सात पटीने घसरला आहे. २५ मे रोजी रुग्ण दुपटीचा कालावधी ३९७३ वर गेला होता. मागील काही दिवसांत यात झपाट्याने घसरण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रोज कोरोना मृत्यूची नोंद बहुतांशवेळा शून्य नोंद होत आहे. बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही समाधानकारक राहिले आहे. मात्र मागील काही दिवसांत सलग मोठ्या फरकाने रुग्णसंख्या वाढते आहे. रोज १४ ते १७ हजार दरम्यान कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. यात १७०० ते १९०० पर्यंत रुग्णसंख्या नोंद होते आहे. म्हणजे २०० ते अडीचशेच्या दरम्यान रुग्णांत वाढ होते आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधीही घसरत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
असा घसरला रुग्ण दुपटीचा कालावधी -
२५ मे - ३९७३
१ जून - २०२७
२ जून - १७६५
३ जून - १५७६
४ जून - १३९६
५ जून - १२०४
६ जून - १०५१
७ जून - ९८६
८ जून - ८६६
९ जून - ७३३
१० जून - ६४२
११ जून - ५६१
No comments:
Post a Comment