मुंबई - राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. राज्यात आज १४९४ नवे रुग्ण आढळले. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याने ही कोरोनाची चौथी लाट असल्याचे विधान राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने केंद्र आणि राज्य सरकार तसेच प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्याआधीच त्याला रोखता यावा, यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
गेल्या ३ महिन्यांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ कमी झाली होती. मात्र आता गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. ८४ दिवसांनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच देशातील नवीन कोविड रुग्णांची संख्या ४ हजारांच्या पुढे गेली, तर ४ फेब्रुवारीनंतर मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वांत मोठी वाढ दिसून आली. मुंबईत गेल्या २४ तासांत तब्बल ९६१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. कोरोनाबाधितांचा हाच आकडा काल ८८९ इतका होता.राज्यातही आज १ हजार ४९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज ६१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
देशात ४ हजारांवर नवे रुग्ण -
देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या २४ तासांत देशात नव्या ४२७० कोविड रुग्णांची नोंद झाली, तर २६१९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. गेल्या २४ तासांमध्ये १५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशभरात २४,०५२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
बॉलिवूडला विळखा -
मुंबईत रुग्णसंख्येचा वेग वाढला असून, बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ आणि आदित्यरॉय कपूर यांच्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखलादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस यांनाही कोरोना -
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुस-यांदा कोरोनाची लागण झाली आहे. काल फडणवीस लातूरला होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर दौरा रद्द करून मुंबईला परतले होते. फडणवीसांनी स्वत: ट्विट करत कोरोना झाल्याची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment