मध्य प्रदेश / भोपाळ - दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांना मध्य प्रदेशात एक डायनॉसोरचं (Dinosaur) एक अजब अंड सापडले आहे. या अंड्याच्या आत एक अंडे (eggs) आढळले आहे. जीवाश्माच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे अंडे सापडले आहे. हा शोध अतिशय महत्त्वाचा आणि दुर्मिळ स्वरुपाचा असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
अंड्यामध्ये अंडे आढळण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. साईंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये याबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील बाग परिसरात संशोधकांना टायटानोसॉरिड डायनासॉरचे हे अजब अंडे आढळले. डायनासॉरचे प्रजनन कासव, पाल, मगर आणि पक्ष््यांसारखे होते का, याचा शोध या अंड्यामुळे लागू शकेल.
मध्य भारतातील वरच्या पट्ट्यात अनेकदा डायनॉसोरचे अवशेष सापडले आहेत. यामध्ये सांगाडे आणि अंड्यांचा समावेश आहे. संशोधकांना बाग परिसरातील एका गावात मोठ्या प्रमाणात टायटानोसॉरिड सॉरोपॉडची अंडी सापडली. यातील एक अंडे वेगळेच होते. असे अंडे संशोधकांनी याआधी पाहिले नव्हते. या अंड्यात दोन गोलाकार कवच होते. दोन्ही कवचांमध्ये अंतर होते.
डायनासॉरमध्ये प्रजनन कासव आणि इतर सरपटलेल्या प्राण्यांप्रमाणे असल्याचे संशोधकांना वाटत होते. याबद्दलचा संशोधन अहवाल डॉ. हर्ष धीमन यांनी लिहिला आहे. धीमन दिल्ली विद्यापीठात संशोधक आहेत. टायटानोसॉरिड सॉरोपॉड पक्ष््यांप्रमाणे अंडी देत असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment