मुंबई - एकनाथ शिंदे यांनी गुरूवार दि. ३० जून रोजी महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून याचवेळी देवेन्द्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रगीत संपल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेन्द्र फडणवीस यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकडून बंड केले. त्यावेळी त्यांच्यावर अनेकांनी टिकास्त्र सोडले होते. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा करत मास्टर स्ट्रोक खेळला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या खेळीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे.
उद्धव ठाकरे सरकारला वेठीस धरणारे एकनाथ शिंदे म्हणजे, कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केले. एक रिक्षाचालकाने आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
सुपरव्हायझर… रिक्षाचालक ते थेट नगरसेवक-
सुरुवातीच्या काळात ते ठाण्याच्या प्रसिद्ध वागळे इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडत आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आणि ठाण्यात ऑटो रिक्षा चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली.
त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला.
कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागलं. पक्षाप्रतिची निष्ठा पाहुन एकनाथ खडसेंना त्यांच्या कामाची पावती मिळालीच. १९८४ साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. ठाण्याच्या किसन नगरचं शाखाप्रमुख पद त्यांना देण्यात आलं. इथूनच खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
एकनाथ संभाजी शिंदे
जन्म : ६ मार्च १९६४.
जन्म ठिकाण : अहिर, तालुका-महाबळेश्वर, जिल्हा-सातारा.
शिक्षण : बी.ए.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता. अपत्ये : एकूण 1 (एक मुलगा).
व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य. पक्ष : शिवसेना.
मतदारसंघ : १४७ -कोपरी-पाचपाखाडी, जिल्हा-ठाणे.
भाजपच्या उमेदवाराला ८९ हजार ३०० मतांनी हरवून विजयी
शिंदे यांना पडलेली मते- १ लाख १३ हजार ४९५
भाजपच्या संजय घाडीगावकर यांना पडलेली मते- २४ हजार १९७
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द :
१९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.
२००४, २००९, २०१४, २०१९ चार वेळा आमदार;
२०१४ ते २०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गटनेते;
१२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विधानसभा विरोधी पक्ष नेता,
५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री;
ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गटनेते;
नोव्हेंबर २०१९ पासून नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.
No comments:
Post a Comment