मुंबई - भर पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर केला जातो. यंदाही पावसांत रस्त्यावर पडलेले खड्डे कोल्डमिक्सने भरले जाणार आहेत. ३ हजार मेट्रिक टन कोल्ड मिक्स तयार केले जाणार असून आतापर्यंत २४ वॉर्डात १,३२५ मेट्रिक टन कोल्ड मिक्सचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली.
पावसाळापूर्व नालेसफाई, रस्ते बांधणी, पुलांची दुरुस्ती अशी विविध कामे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरु आहेत. काही दिवसांनंतर मुंबईत मान्सूनचे आगमम होईल. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात आली असून बहुतांशी कामे पूर्ण झाली असून काही प्रगतीपथावर आहेत. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण अधिक असल्याने खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर यंदाही केला जाणार आहे.
मुंबईतील रस्त्यावर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने २०१७ पासून कोल्डमिक्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पालिकेने ऑस्ट्रियातून महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान साहित्य मागविले होते. मात्र या कोल्डमिक्सचा पाहिजे तितका परिणाम दिसून आला नाही. शिवाय ते महागडेही असल्याने पालिकेने स्वतः कोल्डमिक्स उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला. कोल्ड मिक्स जे बाहेरून आयात करण्यात येत होते, त्याची किंमत प्रति किलो १७० रुपये असल्याने ते महागात पडत होते. त्यामुळे पालिकेने वरळी येथील डांबर प्लांट मध्ये याच कोल्डमिक्स मटेरियलचे उत्पादन केल्याने ते पालिकेला प्रति किलो स्वस्त दरात उपलब्ध होते आहे. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसानंतर रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्सचा वापर करण्यात येतो आहे. मात्र अनेकवेळा कोल्डमिक्स पहिल्याच पावसांत वाहून जात असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सभागृहात कोल्डमिक्सवर प्रश्नितचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
यंदा पावसाळ्यातील खड्डे बुजवण्यासाठी २४ वॉर्डकडून ३०९९ मेट्रिक टन ‘कोल्ड मिक्स’ची मागणी करण्यात आली आहे. मागणीनुसार सुमारे ७० टक्के कोल्ड मिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व वॉर्डच्या साठवणूक क्षमतेनुसार याचे वितरण करण्यात येणार आहे..
२८ रुपयांत कोल्ड मिक्सची निर्मिती -
‘कोल्ड मिक्स’चा वापर करताना सुरुवातीला परदेशातून अद्ययावत तंत्रज्ञान असलेले ‘कोल्ड मिक्स’ आणले जात होते. यामध्ये एका किलोसाठी पालिकेला १७७ रुपये खर्च येत होता. मात्र पालिका याच तंत्रज्ञानाचे आणि त्याच दर्जाचे ‘कोल्ड मिक्स’ वरळी येथील अस्फाल्ट प्लांटमध्ये स्वत: केवळ २८ रुपये प्रतिकिलो या किमतीत बनवत आहे. प्रतिबॅग २५ किलोची बनवली जाते. त्यामुळे एका किलोमागे पालिकेचे १४९ रुपये वाचत आहेत. दरम्यान, सर्व वॉर्डकडून झालेल्या मागणीनुसार बनवण्यात येणार्या ‘कोल्ड मिक्स’साठी यावर्षी पालिका ६ कोटी रुपयांचा खर्च करीत आहे.
तासाभरात रस्ता वाहतुकीला होतो खुला -
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा चौकोनी किंवा त्रिकोणी कट घेतला जातो. यानंतर तुटलेला संपूर्ण भाग काढून टाकला जातो. यानंतर प्रचंड प्रेशरने हवेच्या माध्यमातून खड्डा स्वच्छ करून घेतला जातो. यानंतर कोल्ड मिक्स टाकून रोलिंग केले जाते. साधारणत: अर्धा ते एका तासात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येतो.
No comments:
Post a Comment