मतांसाठी भाजप-सेनेची पळापळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 June 2022

मतांसाठी भाजप-सेनेची पळापळ



मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीबरोबरच भाजपाने सगळी ताकद पणाला लावल्यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली आहे. मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी शिवसेनेसह आघाडीचे आमदार मुंबईत दाखल झाले असून पंचतारांकित हॉटेलात त्यांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान अपक्ष व छोट्या पक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० तारखेला निवडणूक होत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल लक्षात घेता आघाडीचे तीन व भाजपाचे दोन उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. सहाव्या जागेसाठी मात्र शिवसेना व भाजपात प्रचंड रस्सीखेच आहे. सत्तास्थापनेच्यावेळी सरकारच्या पाठीशी १७० आमदारांचे भक्कम बहुमत होते. पण त्यावेळी पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांना व छोट्या पक्षांना भाजपाने या निवडणुकीत आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवल्याची चर्चा आहे.

बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर, समाजवादी पार्टीच्या अबू आझमी यांनी संदिग्ध भूमिका घेतल्याने शिवसेनेची संख्याबळासाठी धावाधाव सुरू आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांना आजच मुंबईत बोलावून घेण्यात आले. त्यांची रिजेन्सी या पंचतारांकित हॉटेलात व्यवस्था करण्यात आली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीसह सरकारबरोबर असलेले अपक्ष व छोट्या पक्षाचे आमदारही मुंबईत दाखल होत असून, उद्यापासून आघाडीच्या सर्व आमदारांचा हॉटेल ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम असणार आहे.

बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत ३ आमदार आहेत. समाजवादी पक्षाचे आणि प्रहारचे प्रत्येकी २ आमदार आहेत, तर माकप, शेकापचा प्रत्येकी एक आमदार आहे. या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे भाजप, शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. याशिवाय १३ अपक्ष आमदारांनीदेखील आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळेही शिवसेना, भाजपचे नेते गॅसवर आहेत. आपली भूमिका स्पष्ट न केलेल्या छोट्या पक्षांच्या आमदारांची आणि अपक्ष आमदारांची एकूण संख्या २२ इतकी आहे. याच २२ जणांच्या हाती शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराचे भविष्य आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतली सेना आमदारांची बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करतानाच शिवसेनेचे दोन्ही उमेदवार पाहिल्या फेरीत निवडून आले पाहिजेत, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मतांचा कोटा व मतदानपद्धतीबाबत ९ तारखेला सर्वांना तपशीलवार सूचना दिल्या जातील. ज्या पसंती क्रमांकानुसार आघाडीच्या उमेदवारांना मते देण्याच्या सूचना देण्यात येतील, त्याप्रमाणेच मतदान करा, अशा सूचनाही यावेळी दिल्या.

शेवटच्या अवघ्या पाच मिनिटात मतदान करू
धान आणि हरभ-याच्या अनुदानाची सरकारने व्यवस्था करावी, अशी मागणी करताना राज्यसभेच्या मतदानाबाबत शेवटच्या पाच मिनिटात निर्णय घेऊ, असा इशारा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. महाराष्ट्रात एक लाख हरभरा उत्पादक शेतक-यांची नोंदणी झाली आहे. केंद्राने खरेदीला नकार दिल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, असे सांगताना आघाडीला शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करु, असे बच्चू कडू म्हणाले.

भाजपचे आमदार ताज हॉटेलमध्ये
राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व निर्माण झाले आहे. शिवसेना, काँग्रेस पाठोपाठ भाजपदेखील त्यांच्या आमदारांना ताज हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे. भाजपचे आमदार ८ जूनला ताज हॉटेलमध्ये पोहोचणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad