मुंबई - "शिवसेना ही कोणत्याही नेत्यामुळे नाही तर सामान्य शिवसैनिकांमुळे उभी राहिली आहे. पक्षात कोणता नेता राहिला किंवा न राहिला, शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या विचारांचा आधार आहे. गद्दारांना क्षमा नाही, हे दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळे शिवसेना याहून जोमाने पुढे जाईल", असं सांगत दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एकनाथ शिंदेंनी पक्षनेतृत्वाच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेवर टीका केली.
"भाजपसोबत सरकार स्थापन करावं. त्या सरकारमध्ये फडणवीस मुख्यमंत्री तर स्वत: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील, अशा प्रकारची ऑफर एकनाथ शिंदे यांनी पक्षनेतृत्वाला दिल्याचं वृत्त विविध प्रसारमाध्यमांनी चालवलं. हे वृत्त जर खरं असेल तर दिघे साहेबांच्या शिकवणीवर त्यांनी बोलू नये. दिघे साहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं. अखेपर्यंत ते शिवेसेनेसाठी झटले. मला वाटतं दिघे साहेबांचा आधार घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडू नये", असं सणसणीत प्रत्युत्तर केदार दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं.
"मी पदावर नसलो तरी शिवसैनिक म्हणून आयुष्यभर राहिल. ठाण्यातील राजकारण अत्यंत गलिच्छ होतं, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून माझ्यात आत्मविश्वास आहे. मी लाचार नव्हतो. दरवाजे उघडणं आणि पाया पडणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही. मी दिघे साहेबांचं आणि बाळासाहेबांचं कार्य केलं", असं सांगत माझ्यात आणि एकनाख शिंदेंमध्ये वैर नसल्याचं सांगायला देखील केदार दिघे विसरले नाहीत.
"एकनाथ शिंदेंच्या काही भूमिका संघटना वाढण्यासाठी बरोबर होत्या. पण म्हणून कुठल्याही नेत्याने एकट्याने शिवसेना वाढवतोय असं कधीही समजू नये. शिवसैनिक हा सदैव शिवसैनिक असतो. त्याच्यामुळे खरी तर शिवसेना जिवंत असते. तो काहीही झालं तरी भगव्याशी प्रतारणा करत नाही. अनेक नेते आले गेले, पण शिवसैनिक कधी मागे हटला नाही", असंही केदार दिघे म्हणाले.
No comments:
Post a Comment