सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिस-याशी अन् गर्भ चौथ्याचा - उज्वल निकम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 June 2022

सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिस-याशी अन् गर्भ चौथ्याचा - उज्वल निकम


अकोला - सोयरिक एकाशी, लग्न दुसऱ्याशी, मंगळसूत्र तिस-याशी अन् गर्भ चौथ्याचा अशी सध्याच्या राजकारणाची परिस्थिती झाल्याचा खोचक टोला ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam on political crises) यांनी लगावला. उज्ज्वल निकम हे आज अकोल्यात एका सन्मान सोहळ्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेत बोलताना त्यांनी सध्याच्या सत्तानाट्यावर भाष्य केले.

सध्याची राजकीय परिस्थिती अक्षरश: वीट आणणारी असल्याचे निकम म्हणाले. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले. सध्याच्या परिस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष काय निर्णय देतात यावर राजकीय कोंडीचे भविष्य असल्याचेही उज्ज्वल निकम यांनी आठवण करून दिली.

न्यायालामध्ये काय निकाल लागेल हे सांगता येणं आज कठीण आहे. पण सध्याची स्थिती अशी आहे की, वसंतरावांच्या घरी नांदायचे, गळ्यात मंगळसूत्र पंडीतरावांच्या नावाचे घालायचे, उखाणा विलासरावांच्या नावाचा घ्यायचा आणि गर्भ मात्र देवरावांचा वाढवायचा अशी परिस्थिती दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहे. महाराष्ट्रात अनेक गंभीर प्रश्न आहेत. पावसाळा सुरू आहे. ही राजकीय जी काही व्यवस्था चालली आहे.

याच्यावर कुठेतरी थांबले पाहिजे, पावसाळा जवळ येत असल्यामुळे शेतक-यांचे अनेक जटील प्रश्न सरकारला सोडवावे लागणार आहेत. अशा प्रकाराची गुंतागुंत ही जास्त वेळ लांबणे हे निश्चित राज्याच्या स्थिरतेला चांगले लक्षण नाही. याच्यावर कुठेतरी अंतिम निर्णय झाला पाहिजे. राज्यकारभार सुरळीत चालला पाहिजे, असा एक नागिरक म्हणून यानिमित्ताने माझी ही अपेक्षा आहे असे देखील उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

राजकारण हा खेळच असतो. त्याच्यामुळे राजकारणात प्रत्येक नागरिकाला हे अपेक्षित असत, कारण राजकारण हे सत्तेच्या टोकापर्यंत जात असल्यामुळे सत्तेचा सारीपाट कोणाच्या ताब्यात आणि तो सारीपाट आपल्याकडे कसा येईल, असा प्रत्येक राजकीय पक्ष हा प्रयत्न करत असतो. त्यालाच राजकारण असं म्हणतात. परंतू हे राजकारण सामान्य नागरिकाच्या हिताशी खेळणारे नको, असेही उज्ज्वल निकमांनी यावेळी बोलून दाखवले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad