ठाणे - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (sc st act) केतकी चितळेला (Ketaki Chitle) अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) तिला पाच दिवसांची पोलीस (Police) कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले.
केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.
केतकीने फेसबुकवर नेमकी काय लिहिलं?
केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क', आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.' नवबौद्धांसंदर्भातल्या वक्तव्यावर तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच ॲट्रॉसिटी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.
No comments:
Post a Comment