महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ! शासनाचे परिपत्रक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 May 2022

महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद ! शासनाचे परिपत्रक


मुंबई, दि १८: कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचे रूपांतर आता शासन निर्णयात झाले आहे. महाराष्ट्रातील सर्व ग्राम पंचायतीनी विधवा प्रथा बंद करण्यासाठी हेरवाड ग्राम पंचायतीचा आदर्श समोर ठेवून कार्य करावे असे शासन परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

आज भारत देश विज्ञानवादी व प्रगतीशील समाज म्हणून वाटचाल करत असला तरी आजही पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातली जोडवी काढली जाणे, यासारख्या प्रथांचे पालन केले जायचे.  या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पल्लवी कोळेकर आणि सरपंच सुरगोंडा पाटील आणि त्यांच्या ग्रामसभेने घेतला. प्रसार माध्यमांनी या ठरावाचा सगळीकडे प्रसार केला आणि शासनाने विधवा प्रथा बंद व्हावी यासाठी ग्रामपंचायती काम करावे, असे आवाहन करत दि. 17 मे 2022 रोजी शासन परिपत्रक जारी केले.

या अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव करणाऱ्या हेरवाड ग्राम पंचायतीचे सरपंच पाटील आणि ग्रामविकास अधिकारी कोळेकर यांनी याबाबत विशेष परिश्रम घेतले. कोल्हापूरात आलेला महापूर आणि त्यानंतरच्या कोरोना काळात घरातील कमावती कर्ती माणसे  मरण पावली. कर्ती माणसे गेल्यानंतर विधवांचा मानसन्मान  आणि समाजाचा बहिष्कार यावर उपाय म्हणून अशा प्रथा बंद करण्याचे धाडस ग्रामसभेने केले. कोल्हापूर जिल्हा हा राजश्री छत्रपती श्री शाहू महाराजांचा जिल्हा आहे. या याच कालावधीत राजश्री छत्रपती शाहू स्मृती शताब्दी साजरा करण्यात येत होता. त्यामुळे राजश्री शाहू महाराजांनी विधवांसाठी केलेल्या कार्याची जाण म्हणून हा क्रांतिकारी निर्णयाचा ठराव केल्याचे सरपंच पाटील यांनी सांगितले. या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी करण्यासाठी महिला संघटनाही प्रयत्न करत होत्या. पण एखादी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याचा धाक आवश्यक होता. शासनाने आता हेरवाड ग्राम पंचायत पॅटर्न सर्व राज्यात राबविण्याचे आवाहन केले आहे.

विधवा महिलांना इतर महिलांप्रमाणे सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. विधवा प्रथांचे पालन होत असल्याने प्रतिष्ठेचे जीवन जगण्याच्या मानवी तसेच संविधनिक अधिकारांचे उल्लंघन होते. त्यामुळे भविष्यात स्त्रियांच्या अधिकाराचे हनन होऊ नये, यासाठी ग्रामविकास विभाग पुढे सरसावला आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही राज्यातील सर्व ग्राम पंचायतीनी हेरवाडचे अनुकरण करून आदर्श ठेवण्याचे आवाहन केले आहे. या कूप्रथा बंद करण्यात महाराष्ट्र कायम आघाडीवर राहिला, हे मात्र खरं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad