नवी दिल्ली - कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसत असतानाच कोविड १९ च्या एका नव्या व्हेरिएंटची एंट्री झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटला एक्सई ( XE ) असे नाव दिले असून हा व्हेरिएंट म्हणजे ओमिक्रॉनचे दोन सब व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 यांचे हायब्रीड व्हर्जन असल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रिटनमध्ये हा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. एक्सई व्हेरिएंटचा संसर्ग दर BA.2 व्हेरिएंटच्या तुलनेत दहा टक्क्यांनी अधिक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोविडचे आतापर्यंत तीन हायब्रीड वा रिकॉम्बिनेंट स्ट्रेन आढळून आले आहेत. पहिला एक्सडी, दुसरा एक्सएफ आणि एक्सई हा तिसरा व्हेरिएंट आहे. यातील पहिल्या आणि दुसऱ्या व्हेरिएंटची उत्पत्ती डेल्टा आणि ओमिक्रॉनच्या कॉम्बिनेशनमधून झाली आहे तर एक्सई हा ओमिक्रॉन सब व्हेरिएंटचा हायब्रीड स्ट्रेन आहे. सर्वप्रथम १९ जानेवारी रोजी ब्रिटनमध्ये या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला. त्यानंतर आतापर्यंत या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सहाशेपर्यंत पोहचली आहे.
रिकॉम्बिनेंट व्हेरिएंट आधीच्या व्हेरिएंटप्रमाणे घातक ठरू शकतात असे साथरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तिन्ही रिकॉम्बिनेंट व्हेरिएंट्सचा विचार केल्यास त्यात एक्सडी व्हेरिएंट सर्वाधिक धोकादायक दिसत असून जर्मनी, नेदरलँड्स आणि डेन्मार्क या देशांत या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. असं असलं तरी सर्वच व्हेरिएंटबाबत दक्षता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, जगभरात कोरोना संसर्गाचा जोर ओसरत चालला आहे. भारतातही करोनाची तिसरी लाट ओसरल्याने निर्बंध उठवण्यात येत आहेत. अशावेळी एक्सई या नव्या सब व्हेरिएंटच्या एंट्रीने चिंतेत भर पडली आहे. या व्हेरिएंटचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो असे सांगण्यात येत असल्याने सतर्कता बाळगावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment