ठाणे / बदलापूर - ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका बारमध्ये धक्का लागल्यावरून झालेल्या भांडणात एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून सीसीटीव्ही ( CCTV ) फुटेजच्या आधारे दोघा संशयीतांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बदलापूर पश्चिम येथील हेंदरपाडा भागात नाईन सिज नावाचे बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे. या बारमध्ये शनिवारी (दि. 9 एप्रिल) रात्री साडे अकराच्या सुमारास सिद्धांत सरोज आपल्या मित्रासोबत मद्यपान करण्यासाठी आला होता. त्यावेळी या बारमधील बाजूच्या टेबलवर चार ते पाच जण मद्यपान करत बसले होते. यातील एकाचा सिद्धांतला चुकून धक्का लागला. यामुळे बारमध्येच वाद होऊन एका आरोपीने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. त्यानंतर सिद्धांत बारमधून बाहेर पडताच पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाठ्या काठ्यांनी जीवघेणी मारहाण केली. या मारहाणीत सिद्धांतला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बदलापूर पश्चिम पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तर सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
No comments:
Post a Comment