नवी दिल्ली / मुंबई - देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राज्यांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच केंद्र सरकार सतर्क झाले असून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह पाच राज्यांना दुस-यांदा पत्र पाठवून अलर्ट केले आहे. पाच दिवसांपूर्वीच अशाप्रकारचे पत्र भूषण यांनी राज्यांना लिहिले होते. त्यानंतर स्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत.
देशातील कोविड स्थितीवर केंद्र सरकारचे बारीक लक्ष आहे. तिसरी लाट ओसरल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले होते. मात्र, काही राज्यांत परत रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यासोबत टेन्शनही वाढले आहे. त्यामुळेच अवघ्या पाचच दिवसांत आज केंद्राकडून दुस-यांदा राज्यांना पत्र पाठवले गेले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज हरयाणा, दिल्ली , महाराष्ट्र , उत्तर प्रदेश आणि मिझोराम या राज्यांना पत्र लिहून सतर्क केले आहे. या पाच राज्यांत कोविड पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. त्यासह रुग्णसंख्येतही मोठी वाढ दिसत आहे. याबाबत पत्रात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात यावीत. स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे आणि कोविड विषयक सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जावे, अशी सूचना या पत्रात करण्यात आली आहे. कोविड स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पंचसूत्री राबवा. टेस्टिंग, ट्रॅकिंग तसेच लसीकरणावर भर द्या. कोविड अनुरूप वर्तन पाळले जाईल, यासाठी पावले उचला. गर्दीच्या ठिकाणी लोकांनी मास्कचा वापर करणे आवश्यक असून त्याबाबत कोणतीही ढिलाई नको, अशाप्रकारच्या सूचनाही या पत्रात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, दिल्लीतील कोविड स्थिती गंभीर बनत चालली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत कोरोनाचे ६३२ नवे रुग्ण आढळून आले. १७ फेब्रुवारीनंतरची ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली. दिल्लीच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरयाणातील जिल्ह्यांमध्येही रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही आज ४५ दिवसांतील सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली. आज कोरोनाचे ८५ नवे रुग्ण आढळले. या स्थितीवर केंद्र लक्ष ठेवून आहे व त्यासाठीच केंद्रीय आरोग्य विभागाने अलर्ट करणारं पत्र लिहिले आहे.
No comments:
Post a Comment