मुंबई - मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या बेस्टने प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी भाडेतत्वावर बसेस घेतल्या आहेत. कंत्राटदार कंपनीने वेळेवर पगार न दिल्याने आज सकाळी या बसच्या चालकांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे बेस्ट सेवेवर परिणाम होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. याबाबत कंत्रादारावर कारवाई करण्यात येईल असे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
बेस्ट उपक्रम आर्थिक अडचणीत आहे. बेस्टला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी खासगी बसेस चालवण्याचा सल्ला पालिका आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार बेस्टच्या ताफ्यात मिडी, मिनी, एसी बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. या बसेस चालवण्याच्या बदल्यात कंत्राटदार कंपनीला प्रति किलोमीटर पैसे दिले जात आहेत. यामधून कंत्राटदाराला चालकाचा (ड्रायव्हर) पगार, सीएनजी गॅस, बसचे मेंटनंस करावे लागते. मात्र कंत्राटदाराने आपल्या चालकांना गेले पाच ते सहा महिने दिलेला नाही. याकारणाने आज सकाळी अचानक खासगी बस चालकांनी एकही बस रस्त्यावर काढली नाही. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेकांना खासगी टॅक्सी, रिक्षा, ओला, ओबेर आदी वाहनांनी रेल्वे स्टेशन तसेच आपले कार्यालय गाठावे लागले.
योग्य कारवाई करू -
खासगी बस चालकांनी केलेल्या काम बंद आंदोलनाबाबत बेस्ट प्रशासनाशी संपर्क साधला असता, भाडेतत्त्वावर बसगाड्या चालवणाऱ्या मारुती कंपनीने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न दिल्यामुळे त्या कंपनीच्या कामगारांनी बस गाड्या न चालवण्याचा निर्णय घेऊन आंदोलन केले. परंतु बेस्टच्या प्रशासनाने सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांची बोलणी केली आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन बस गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. सदर कंपनीविरुद्ध कंत्राटामध्ये ठरलेल्या अटी आणि शर्ती नुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment