मुंबई, दि. 18 :- मुंबई शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरु असलेल्या तसेच प्रस्तावित कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यामध्ये वरळी-शिवडी, नरीमन पॉईंट-कफ परेड या कामांबाबत चर्चा करण्यात आली. ही कामे करताना नागरी सुविधा कमीत कमी बाधित होतील याची दक्षता घ्यावी, जेथे खोदकाम करावयाचे आहे तेथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी. प्रकल्प बाधितांचे योग्य पुनर्वसन व्हावे, अत्यावश्यक असतील तेथेच आणि कमीत कमी झाडे तोडावीत, बाधित होणाऱ्या व्यक्तींना प्रकल्पाबाबत प्रत्यक्ष भेटून माहिती द्यावी, असे निर्देश ठाकरे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
दक्षिण मुंबईकडे येताना होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नरीमन पॉईंट ते कफ परेड यांना जोडणारा मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गाच्या प्रगतीचाही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज आढावा घेतला. व्यावसायिक केंद्र असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे येथे वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. यावर उपाय म्हणून प्रस्तावित असणारा हा रस्ता नरीमन पॉईंट पासून कफ परेड कडे जाणाऱ्या प्रकाश पेठे मार्गापर्यंत उड्डाणपूल स्वरूपात असल्याने वाहतूक कोंडी सुटण्यास मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमारांच्या दैनंदिन जीवनात बाधा येऊ नये यादृष्टीने त्यांच्यासमवेत पुन्हा एकदा चर्चा करण्यात यावी, तसेच या मार्गाच्या अंतिम मान्यतेसाठी सर्व संबंधित विभागांच्या परवानगीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश मंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.
या बैठकांना खासदार अरविंद सावंत, आमदार सदा सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासु, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment