मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. राज ठाकरेंच्या या विधानानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी भोंगे लावून हनुमान चालिसा लावल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज चक्क मनसेने मुंबईतील ‘शिवसेना भवन’समोर हनुमान चालिसाचे पठण केले. यावर संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
मशिदीवरील भोंग्यांवरून आक्रमक झालेल्या मनसेने आज थेट शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा पठण केले. आज रामनवमी उत्सव आहे. त्याचे औचित्य साधून मनसेने शिवसेनेला डिवचले. मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांच्या पुढाकाराने शिवसेना भवनासमोर हनुमान चालिसा भोंग्याद्वारे लावण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तसेच भोंगे देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आले. मनसेच्या सदर प्रकरणावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संपलेल्या पक्षाला मी उत्तर देत नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे. तसेच स्टंटबाजीला मी भाव देत नाही, असेही यावेळी आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
शिवसेना भवन हिंदूंचे पवित्र स्थळ -
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवसेना भवन ही काही मशिद नाही, ज्याच्यासमोर हनुमान चालिसा लावली म्हणून कारवाई केली. शिवसेना भवन हे हिंदूंचे पवित्र स्थळ आहे. मग कारवाई का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मुख्यमंत्री असताना अशा पध्दतीने कारवाई होतेय हे दुर्दैव आहे, असे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment