मुंबई - देशभरात मेट्रो, बस, रेल्वे यांसह सर्व प्रकारच्या स्थानिक प्रवासासाठी सामायिक सुविधा असावी, प्रवास सुलभ व्हावा या उद्देशाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकच सामायिक कार्ड) ही संकल्पना लागू करण्यात आली. ही सुविधा दिल्लीसह अन्य काही मोजक्या शहरात सुरू झाली. आता मुंबईत ही योजना लागू करण्यात येणार आहे.
कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तास ते दीड तास किंवा त्याहून अधिक वेळ प्रवास बहुतांशी मुंबईकरांना करावा लागतो. यासाठी अनेकवेळा वेगवेगळी वाहतूक साधने वापरून इच्छित स्थळ गाठावे लागते. हा वेळ काहीसा कमी करून झटपट प्रवासासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचा फायदा होणार आहे. या कार्डामुळे मुंबई महानगरात उपनगरीय रेल्वेची विस्तारलेली सेवा, स्थानिक पालिकांच्या परिवहन बस सेवा, रिक्षा, टॅक्सी, मेट्रो, मोनो अशा विविध साधनांमधील वाहतूक एकाच तिकिटावर करता येणे शक्य होणार आहे. हे कार्ड रिचार्जही करता येणारे आहे. देशभरातील काही मोजक्याच शहरात ही सेवा सुरू झाली आहे.
बेस्टने ऑक्टोबर २०२० पासून चाचणीला सुरुवात केली. त्यानंतर आता प्रत्यक्षात ही योजना सुरु होणार आहे. मुंबईसह देशभरात या प्रणालीचा वापर होत असेल. बेस्ट उपक्रमाने रोख रक्कम देऊन तिकीट देणाऱ्या सेवेचा वापर कमी व्हावा म्हणून ‘चलो’ मोबाईल तिकीट ॲपही आणले. तर मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर तिकीट व पास काढणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असून त्यापाठोपाठ मोबाईल तिकीट ॲप, एटीव्हीएम स्मार्ट कार्ड, जनसाधारण तिकीट सेवांचा वापर होतो. असे अनेक पर्याय उपलब्ध असताना मोबिलिटी कार्डची सेवा प्रवाशांच्या पचनी पाडण्यासाठी परिवहन सेवांना कसरत करावी लागणार आहे.
No comments:
Post a Comment