मुंबई - उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला विजय मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी मुंबईत प्रदेश कार्यालयात प्रचंड जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भाजपाला यश मिळाले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
गोवा विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रकांत पाटील यांनी विशेष अभिनंदन केले. निवडणूक प्रभारी म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला बिहार विधानसभा निवडणुकीत यश मिळाले. त्यानंतर आता गोव्याची विधानसभा निवडणूक भाजपाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिंकली असल्याचे पाटील म्हणाले.
ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत, नाचत आणि जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी भाजपाचा चार राज्यातील विजय साजरा केला. भाजपा नेते मा. गिरीश महाजन, आशिष शेलार, सुभाष देशमुख, राधाकृष्ण विखे पाटील, श्रीकांत भारतीय, अतुल सावे, किरीट सोमय्या, देवयानी फरांदे, संजय कुटे, बबनराव लोणीकर, जयप्रकाश ठाकूर, उमा खापरे, ऐजाज देशमुख, संजय पांडे, केशव उपाध्ये, अभिमन्यू पवार, गणेश हाके आणि मुकुंद कुलकर्णी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जल्लोषात सहभागी झाले.
चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून विकास कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने सामान्य लोकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण केले. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने देशातील जनतेची सेवा केली. याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाच्या राज्य सरकारने गोवा, मणिपूर आणि उत्तराखंड या राज्यातही सामान्य माणसासाठी काम केले. त्यामुळे भाजपाच्या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते.
ते म्हणाले की, भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या कार्यकाळात पक्ष संघटनेच्या विस्तारासाठी आणि बळकटीसाठी व्यापक काम करण्यात आले. भाजपा अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात पक्ष संघटना आणखी बळकट झाली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचे रुपांतर पक्षाच्या मतांमध्ये झाले.
त्यांनी सांगितले की, गोवा विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या यशासाठी पक्षाचे गोव्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महाराष्ट्रात भाजपाचे उद्दीष्ट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये विजय मिळविण्याचे आहे. भाजपा मुंबई महानगर पालिकेवर आपला भगवा झेंडा फडकवेल.
No comments:
Post a Comment