शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 March 2022

शासकीय विभागांकडून दर्जेदार विकासकामे व्हावीत - उपमुख्यमंत्री अजित पवार



रत्नागिरी - प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आत्मविश्वास आणि शासकीय कामातील स्वारस्य अधिक वाढल्यास समाजातील विविध घटकांचा सर्वांगीण विकास घडेल, शासकीय विभागांकडून अतिशय तत्परेतेने दर्जेदार विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज खेड येथे व्यक्त केली.

बिसू हॉटेल, खेड येथे आज त्यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध प्रश्नासंदर्भात प्रशासकीय आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार भास्कर जाधव, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, जिल्हा कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, उपविभागीय वनाधिकारी श्री.खाडे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी रत्नागिरी जिल्ह्यात होणारी विविध विकास कामे व राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध शासकीय विभागातील विकास कामांबाबत सविस्तर आढावा घेतला. प्रशासकीय कामांना येणाऱ्या अडचणींबाबत विचारणा करुन येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या बैठकीत उपमुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजना, डोंगरी विकास, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कोविड 19 बाबत केलेल्या उपाययोजना, सिंधूरत्न समृध्द योजना, कृषी विभाग,मत्‍स्य विभाग, रोजगार हमी योजना, प्रादेशिक पर्यटन विकास, नगरपालिका प्रशासन, माझी वसुंधरा, वन विभागांतर्गत संरक्षित केले जाणारे कांदळवन पार्क, प्राणीसंग्रहालय उभारणी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी योजना,पणन विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदि प्रशासकीय विभागांचा आढावा घेतला.

पणन विभागामार्फत रत्नागिरीतील स्थानिक शेतकऱ्यांसाठी आंबा विक्री महोत्सव मार्च अखेर भरविण्यात येतो. आंब्याचा मुख्य हंगाम एप्रिल व मे हे दोन महिने आहे. या दोन महिन्यांमध्ये निधी उपलब्ध होत नसल्याने आंबा विक्री प्रदर्शनास अडचणी निर्माण होतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी माहे एप्रिल मध्ये आंबा विक्री प्रदर्शनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबधितांना दिल्या. त्याचबरोबर आंबा निर्यातीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच रब्बी हंगाम क्षेत्र विस्तार मोहिमेंतर्गत कुळीथ, चवळी, पावटा, वाल,व भाजीपाला या पिकांचे उत्पादन वाढविण्याबाबत सूचना केल्या.

प्राणीसंग्रहालयाच्या उभारणीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या की, या अधिकाऱ्यांनी जगभरातल्या विविध प्राणीसंग्रहालयांचा अभ्यास करावा त्याचबरोबर आपल्या येथील वातावरणात कोणते प्राणी सुरक्षितपणे राहू शकतात, टिकू शकतात, याचाही अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे प्राणीसंग्रहालय उभारावे.

बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद इमारतीच्या बांधकामाबाबतचाही आढावा घेतला. ते म्हणाले की, कोणत्याही शासकीय इमारतीचे बांधकाम हे उत्कृष्ट दर्जाचे व आकर्षक असणे आवश्यक आहे. पालघर जिल्हयातील नवनिर्मित प्रशासकीय इमारतीप्रमाणे बांधकामाचा आराखडा तयार करावा. जिल्ह्यातील विश्रामगृहांच्या दुरुस्तींचे प्रस्ताव तत्काळ सादर करुन दुरुस्ती करुन घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

खासदार सुनिल तटकरे हे रत्नागिरी विमानतळाबाबत सूचना करताना म्हणाले की, रत्नागिरी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा या दृष्टीकोनातून विमानतळाची धावपट्टीची लांबी वाढविणे आवश्यक आहे.रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 च्या निर्मितीकरिता भारत सरकार कडून काही अडचणी असल्यास त्या अडचणींचे निराकरण मी माझ्या स्तरावर करीन, असे त्यांनी यावेळी सांगितले. भूसंपादनात जमिनी गेलेल्या भूधारकांना तात्काळ मोबदला मिळावा, यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न करावेत,असेही ते म्हणाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदूराणी जाखड यांनी जिल्हा परिषदेच्या संबंधित असलेल्या प्रशासकीय तसेच निधीविषयीच्या अडचणी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडल्या. त्यावर उपमुख्यमंत्र्यांनी निधीबाबतच्या अडचणी तत्काळ सोडविण्याबाबत आश्वासित केले.

पोलीस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय, कोस्टल सिक्युरिटी साठी प्रशिक्षण केंद्र, अडगळीच्या ठिकाणी असलेल्या पोलीस वसाहतींची पुनर्बांधणी, फायरिंग रेंज तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री महोदयांकडे निधीसाठी विनंती केली. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेला निधी तात्काळ दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad