मुंबई - अत्याचाराचा सामना करण्यासाठी प्रथम महिलांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. ते प्रशिक्षण देण्यास मुंबई पोलीस सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांनी दिले. ते मुंबई मराठी पत्रकार संघ व स्वयं फाऊंडेशनतर्फे `निर्भया पथक' (Nirbhaya) या स्त्रियांच्या संरक्षणासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. (Police will train women to deal with atrocities)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत `निर्भया पथक' या मुंबई पोलिसांमार्फत स्त्रियांच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या योजनेचा कार्यारंभ नुकताच झाला. या विषयावर पत्रकार संघात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे होते.
यावेळी संजय पांडे म्हणाले, महिलांना संरक्षण देण्यासाठी 3 प्रकारचे कायदे आहेत. यात बाल लैंगिक अत्याचार कायदा, पोक्सो कायदा व भारतीय दंड विधान संहिता कलम 498 अन्वये संरक्षण. हे तिन्ही कायदे हे महिलांच्या सक्षमीकरणाकरिता वेळोवेळी साहाय्य करीत असतात. परंतु स्त्रियांना योग्यवेळी शिक्षण देणे, नोकरीमध्ये सक्षमीकरण करणे आदी गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण, 60 ते 80 वयापर्यंत महिलांना कोणत्याही प्रकारचे कायद्यामध्ये संरक्षण नाही. त्याकरिता या वयोगटातील महिलांना कसे संरक्षण देता येईल व कसा न्याय देता येईल, याबाबत निर्भया पथकाने योग्य तो विचार करावा. काही मदत लागेल ती आम्ही देऊ.
याचबरोबर महिलांनी कोणत्याही अत्याचाराला बळी न पडता पोलिसांत रितसर तक्रार दाखल करावी. जेणेकरून संबंधितांवर कठोर कारवाई करणे सोपे जाईल. लेखी तक्रार केली तरच निर्भया पथकाचा उद्देश सफल होईल, असे मला वाटते. तसेच महिलावरील अत्याचार करणारा `शक्ती' कायदा अस्तित्वात आला आहे. हा कायदा महत्त्वपूर्ण आहे. दरम्यान, आजही भ्रृण हत्या केल्या जातात, याकडेही आयुक्तांनी लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणाबाबतही आयुक्तांनी चिंता व्यक्त केली. 60 व 80 च्या वरील ज्येष्ठ नागरिक घरात एकटे असल्यास त्यांना फसविणे सोपे जाते. ते असहाय्य असतात. त्यांच्या मदतीसाठी कायदा होणे आवश्यक आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारांच्या माध्यमातून या समस्येला वाचा फोडावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, संजय पांडे यांच्या रूपात आज मुंबई पोलीस आयुक्तपदी धडाडीचे पोलीस आयुक्त आपल्याला लाभले आहेत. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. स्वयं फाऊंडेशनने निर्भया पथकासाठी 150 महिला स्वयंसेविका निवडल्या असून त्या पोलिसांना मदत करतील. शेवटी महिलांचे संरक्षण ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून समाजाची देखील ती जबाबदारी आहे. या धारणेतूनच मुंबई मराठी पत्रकार संघाने आज हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
स्वयं फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. निलेश पावसकर म्हणाले की, महाराष्ट्रामधील स्त्रियांवरील अत्याचार यांचे प्रश्न जलदगतीने निकाली काढण्यासाठी आम्ही निर्भया पथकाची स्थापना केलेली आहे. ते पोलिसांना वेळोवेळी त्यांच्या कामांमध्ये मदत करतील असे मी आश्वासन देतो व आज 150 महिलांचे `निर्भया पथक' स्थापन झाल्याचे जाहीर करतो. फाऊंडेशनने या योजनेसाठी निवडलेल्या मुंबईतील व नवी मुंबईतील 100 स्त्री स्वयंसेविका आज या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमास आग्रीपाडा, पार्कसाईट, नायगाव मीरा-भाइंर्दर, कांजूरमार्ग, नालासोपारा, नवी मुंबई, विक्रोळी आदी भागातून महिला सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे पत्रकार संघाचे सभागृह तुडूंब भरले होते. या महिलांमध्ये जोरदार उत्साह दिसत होता. यावेळी संघाचे कार्यवाह विष्णू सोनवणे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment