मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. यामुळे रुग्णसंख्येत घट होऊन गेल्या दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णसंख्या सध्या नोंद होत आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. मुंबईत सध्या ४०५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील ३२५ जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याची दिलासादायक चित्र आहे. तर ५१ जणांमध्ये सौम्य लक्षणे असून फक्त ३० जणांची प्रकृती खालावलेली आहे. त्यामुळे मुंबईतून कोरोना आटोक्यात आल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबईत कोरोना आटोक्यात -
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. पहिल्या लाटेत संपूर्ण मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली होती. आतापर्यंत तीन लाटा आल्या. यामध्ये पहिल्या दोन लाटांमध्ये मोठ्या प्रमाणातील मृत्यूदरामुळे मुंबईचे टेन्शन वाढले होते. दोन लाटांवर नियंत्रण मिळवल्यानंतर डिसेंबरअखेर पुन्हा कोरोनाची तिसरी लाट आली. तिसर्या लाटेत रोजची रुग्णसंख्या तब्बल २० हजारांवर पोहचून विक्रमी नोंद झाली. मात्र यावेळी रुग्णसंख्या वाढली पण मृत्यूदर कमी होता. आता जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल वीस वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. पालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्यामुळे तिसर्या लाटेत मृत्यूदर कमी राहिल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सद्यस्थितीत लसीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांपैकी १०० टक्के जणांचा पहिला डोस झाला असून ९८ टक्के लाभार्थ्यांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ११ हजार दिवसांवर -
मुंबईत कोरोनाच्या तिस-या लाटेत रुग्णसंख्या वाढली. मात्र यावेळी मृत्यूदर कमी होता. शिवाय बरे होणा-या रुग्णांची संख्या मोठी होती. पालिका व राज्य सरकार यांच्या प्रभावी उपाययोजना व नियमांची अंमलबजावणी यामुळे केवळ एका महिन्यातच कोरोना नियंत्रणात आला. रुग्ण दुपटीचा कालावधी झपाट्याने वाढला आहे. ३१ डिसेंबर रोजी मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३६० दिवस होता. हा कालावधी आणखी खाली घसरून १० जानेवारीपर्यंत ३० दिवसांवर आला होता. तिसरी लाट आटोक्यात आल्यामुळे जानेवारीअखेर रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून ३२२ दिवसांवर गेला. दरम्यान, सद्यस्थितीत दररोज २० हजार चाचण्या होत असतानाही शंभरपेक्षा कमी दैनंदिन रुग्ण नोंद होत आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी थेट १० हजार ७६२ दिवसांवर पोहोचला आहे.
मुंबईचा कोरोना स्थिती -
- एकूण सक्रिय रुग्ण - ४०५
- लक्षणे असलेले रुग्ण - ५१
- लक्षणे नसलेले रुग्ण - ३२४
- अत्यवस्थ असलेले रुग्ण - ३०
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण - ९८ टक्के
- रुग्ण वाढीचे प्रमाण - ०.०१ टक्के
- आतापर्यंत लागण - १०,५७,१३४
No comments:
Post a Comment