मुंबई - दरवर्षी पावसापूर्वी १०० टक्के नालेसफाई होत असल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. मात्र तरीही अनेक ठिकाणी नाले तुंबून पूरस्थिती निर्माण होत असल्याने मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जातो. यंदा पालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करण्यासाठी सुमारे १५० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. मुंबईतील विविध भागातील छोटे मोठे नाले, तुंबणाऱ्या पर्जन्यजलवाहिन्या, रस्त्यांवरील जलमुखे तुंबत असल्याने त्यांचा निचरा करण्यासाठी गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे.
मुंबईतील बहुतांश भागातील पर्जन्य जलवाहिन्यांचा काही भाग हा भरती ओहोटीचा परिणाम जाणवणाऱ्या भागात येतो. त्यातून, गाळ साचून राहतो आणि पाण्याचा निचरा होण्यात अडथळे येतात. त्यासाठी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातर्फे दरवर्षी नालेसफाईची कामे केली जात असून त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र वेळेत नाले सफाईची कामे होत नाहीत शिवाय नाल्यातील संपूर्ण गाळ काढला जात नाही. यावरून सत्ताधारी - विरोधकांमध्ये अनेकवेळा वादही रंगला आहे.
यंदा या कामांसाठी पालिका दीडशे कोटी रुपये खर्च करणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेस मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रणासाठी कालबद्ध कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पालिकेतर्फे मिठी नदी विकास आणि प्रदूषण नियंत्रण प्रकल्पाच्या अंतर्भूत कामाचा कृती आराखडा प्रदूषण मंडळाला सादर केला आहे. या कृती आराखड्याचे पालन न झाल्यास पालिकेस प्रत्येक पातमुखामागे प्रत्येक महिन्यास दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे, नालेसफाईची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी पालिकेचा प्रयत्न असणार आहे.
नालेसफाईच्या कामातील पहिला टप्पा हा पावसाळापूर्व असून त्या कामास सुरुवात झाल्यापासून ३१ मे २०२२ पर्यंत वार्षिक कामाच्या अनुषंगाने ७५ टक्के गाळ काढण्यात येतील. दुसरा टप्पा हा पावसाळ्यातील असून त्याचे काम १ जून रोजी सुरू होऊन ३० सप्टेंबर रोजी संपेल. त्यात १५ टक्के गाळ काढला जाणार असून तिसरा टप्पा १ ऑक्टोबर रोजी सुरू होऊन ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपेल. त्यात उर्वरित १० टक्के गाळ काढण्यात येईल.
असा केला जाणार खर्च -
- दादर, एल्फिन्स्टन, परळ, माटुंगा येथे सुमारे २० कोटी रुपये खर्च
- कुलाबा, सँडहर्स्ट रोड, मरिन लाइन्स, ग्रॅन्ट रोड, भायखळा येथे २ कोटी ७१ लाख रु.
- चेंबूर पूर्व आणि पश्चिम भागात १७ कोटी ७९ लाख रु.
- मुलुंड भागात ९ कोटी ४६ लाख रुपये
- पश्चिम उपनगरातील खार, वांद्रे, अंधेरी पूर्व-पश्चिम, गोरेगाव, मालाड, कांदिवली, दहिसर पट्ट्यात ८६ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
No comments:
Post a Comment