मुंबई - मुंबई पालिकेने उंदीर मारण्यासाठी केलेल्या १ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावावर भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्थायी समितीत जोरदार आक्षेप घेतला. १ कोटी रुपये खर्च केल्यावर किती उंदीर मारले याची माहिती नसल्याने पालिकेने उंदीर मारण्यात १ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. सत्ताधारी शिवसेनेने केलेला 'मूषक खर्च' म्हणजे सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असल्याची घणाघाती टीका गटनेते शिंदे यांनी केली. (Bmc Rat Scam)
उंदीर मारण्याच्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता नाही. १२ प्रशासकीय विभागात उंदीर मारण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केली आहे. प्रस्तावामध्ये किती उंदीर मारले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? त्यांची उत्पत्तीस्थाने काय होती ? कायमस्वरूपी नेमक्या उपायोजना काय केल्या? त्याची कुठलीही स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. गेली अनेक दिवस मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ (क) आणि कलम ७२ अंतर्गत महापौर, महापालिका आयुक्त जो खर्च करतात त्यामध्ये वारंवार त्रुटी आढळून आल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने अनेकवेळा त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीही वारंवार आर्थिक बाबींशी संबंधित या कलमांचा फायदा घेऊन सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात असून भारतीय जनता पक्षाचा याला तीव्र विरोध असून प्रसंगी रस्त्यावर उतरू असा इशारा गटनेते शिंदे यांनी दिला. शिवसेनेने घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याचे सांगत गटनेते शिंदे यांनी स्थायी समिती अध्यक्षांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.
No comments:
Post a Comment