मुंबई - महिला जागृत झाल्या तरच समाज जागृत होतो. आई शिक्षित झाली तर सर्व समाज जागृत होईल, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत असत. पक्षातही महिलांना संधी दिली जाते. याचाच एक भाग म्हणून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महिलांना ५० टक्के उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा रिपाईंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने दादरमधील वीर सावरकर सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती माता सवित्राबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना काळात रुग्णसेवा केलेल्या महिला डॉक्टर आणि परिचारिका यांचा कोविड योद्धा म्हणून आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये कुसुम गांगुर्डे लिखीत माझे क्षितीज या पुस्तकाचे रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मोठ्या संख्येने महिला सदस्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवलेही या कार्यक्रमात उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment