पत्रकारांवर हल्ल्याप्रकरणी 29 गुन्हे, पत्रकार कल्याण निधीत 35 कोटींची तरतूद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2022

पत्रकारांवर हल्ल्याप्रकरणी 29 गुन्हे, पत्रकार कल्याण निधीत 35 कोटींची तरतूद



मुंबई, दि. 22 - शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत सध्या 35 कोटी रुपये राष्ट्रीयकृत बँकेत मुदतठेव स्वरूपात गुंतवण्यात आले असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजामधून राज्यातील पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा त्यांच्या मृत्यूपश्चात वारसांना मदत करण्यात येत आहे. तसेच पत्रकारांवर हल्ल्याप्रकरणी 29 गुन्हे दाखल करण्यात आल्याचे (29 cases of assault on journalists) माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

याविषयी विधानसभेचे सदस्य रोहित पवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना कुमारी तटकरे बोलत होत्या. या योजनेंतर्गत अधिस्विकृतीधारक पत्रकार व त्याची पत्नी/पती तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेली मुले यांना वैद्यकीय उपचारार्थ आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत आजवर 258 पत्रकार व त्यांचे कुटुंबिय यांना एकूण 1 कोटी 58 लाख 52 हजार 711 रुपये एवढी रक्कम वैद्यकिय कारणास्तव आर्थिक मदत करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. 

पत्रकारांना सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये केशरी व पिवळे शिधापत्रिकाधारक किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला असलेल्या पत्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे राज्यातील पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांना याचा फायदा झाला आहे. याच दृष्टीकोनातून महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये पत्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे.

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीत पूर्वी 10 कोटी रुपयांची तरतूद होती. गेल्या दोन वर्षात त्यामध्ये आणखी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहितीही तटकरे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील प्रसारमाध्यमातील व्यक्ती आपली कर्तव्ये पार पाडत असताना त्यांच्यावर होणाऱ्या हिंसक कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि प्रसारमाध्यमातील व्यक्ती किंवा प्रसारमाध्यम संस्था यांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा हानी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच अनुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता  त्याअंतर्गत आजवर 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यावरही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad