कल्याण - प्रवाशाला दमदाटी करत त्याच्या जवळील मोबाईल हिसकावून पळणाऱ्या तीन चोरांना रेल्वे पोलिसांनी अटक केली. सीसीटीव्ही तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. शाहिद शेख, सागर म्हात्रे ,जयदीप राऊत अशी चोरांची नावे असून शाहिद शेख सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी देखील चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या तिघांमधील एक जण संधी साधत प्रवाशाला दमदाटी करत त्याचा मोबाईल हिसकवायचा त्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघे विविध दिशेला पळून जात होते. पोलिसांनी या तिघांकडून आतापर्यंत चोरी केलेले सव्वा लाखांचे मोबाईल हस्तगत केले.
कल्याण रेल्वे स्थानकावर 17 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला तीन जणांनी दमदाटी केली. या प्रवाशा जवळील महागडा मोबाईल हिसकावून हे तिघेही पळून गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात प्रवाशाने तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही तपासले. एका कॅमेरात तिघेही आरोपी कैद झाले. या सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीची ओळख पटवली. सीसीटीव्हीत दिसणारा आरोपी शाहिद शेख हा सराईत चोर होता.
कल्याण रेल्वे पोलीसानी तत्काळ शाहिद याचा पत्ता शोधत कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात सापळा रचून अटक केली. शाहिदकडून पोलिसांनी चोरी केलेला मोबाईल हस्तगत केला याच दरम्यान सीसीटीव्ही दिसणारा त्याच्या आणखी दोन साथीदाराची देखील माहिती पोलिसांनी मिळवली. त्यानंतर सागर म्हात्रे व जयदीप राऊत यांना देखील पोलिसांनी अटक केली. सराईत चोर शाहिद दोन साथीदार सागर आणि जयदीप च्या मदतीने तो प्रवाशांना लुटायचा. त्यानंतर पोलिस व प्रवाशांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे तिघेही विविध दिशेला पळून जायचे. अखेर प्रवाशांना लुबाडणाऱ्या टोळीचा पोलिसांनी 24 तासात पर्दाफाश करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
No comments:
Post a Comment