मुंबई - गोरेगावातील शाखा क्रमांक ४० च्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजचा एक भाग अचानक कोसळल्याची घटना शनिवारी घडली. यावेळी काही महिला स्टेजवरून खाली कोसळल्या. कार्यकर्त्यांनी तातडीने बाहेर काढल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने स्टेज कोसळल्याचे सांगण्यात येते. स्टेजवर मनसे प्रमुख राज ठाकरेही होते. त्यांच्या हस्ते या शाखाचे उद्घाटन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते मनसेच्या शाखा कार्यालयाचे उद्घाटन सुरू आहे. मुंबईत चांदिवली आणि गोरेगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. चांदिवली येथील शाखेचे उद्घाटन केल्यानंतर राज ठाकरे यांनी गोरेगाव पूर्व शाखा क्रमांक ४० च्या शाखेचे उद्घाटन केले. समारंभासाठी एक व्यासपीठ उभारण्यात आले होते. स्टेजवर राज ठाकरेही होते. राज ठाकरे आल्यामुळे याठिकाणी प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर गर्दी केली. व्यासपीठावर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने व्यासपीठाचा एक भाग अचानक कोसळला. त्यामुळे काही महिला व्यासपीठावरून खाली कोसळल्या. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी या महिलांना तातडीने बाहेर काढले. सुदैवाने या महिलांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
या कार्यक्रमावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले. मनसेच्या शाखेत समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, ही आपल्यावरची मोठी जबाबदारी आहे. मनसेच्या शाखा या राजकीय दुकाने होता कामा नये, तर या शाखा न्यायालय झाल्या पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ३६५ दिवस महाराष्ट्रात शिवजयंती साजरी झाली पाहिजे. आपल्या राजाचा तो दिवस असल्याचेही ते म्हणाले.
No comments:
Post a Comment