मुंबई - पालिकेने मार्च २०२० पासून जानेवारी २०२२ पर्यंत ४ लाख १३ हजार ४९२ उंदरांना मारले आहे. यात जानेवारी २०२० मध्ये २५ हजार १८ मुषकांचा नायनाटासाठी ४ लाख ९८ हजार ४३८ रुपयांचा खर्च केला आहे. तर, फेब्रुवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या काळात २ लाख ३२ हजार ९०४ उंदीर संपवण्यात आले असून त्यासाठी ४६ लाख ८२ हजार २४ रुपये खर्च झाला आहे. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळात १ लाख ५५ हजार ५७० उंदीर मारण्यात आले असून त्यासाठी २७ लाख ६९ हजार रुपयांचा खर्च केला आहे.
पालिकेने मार्च २०२० मध्ये मुंबईतील २२ प्रभागांसाठी मुषक नाशक म्हणून खासगी संस्थाची नियुक्ती केली होती. मात्र, कोविड मुळे त्यातील १२ प्रभागात उंदीर मारण्याचे काम झाले. मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या ११ महिन्यानंतर पुन्हा याच प्रभागातील संस्थांना मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ डिसेंबर २०२१ पर्यंत होती, अशी माहिती महानगर पालिकेने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.
पालिकेने या काळात झालेल्या खर्चाचा प्रस्ताव कार्योत्तर मंजूरीसाठी गेल्या आठवड्यात स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. यात एक कोटी रुपयांचा खर्च झाला असल्याचे नमुद करण्यात आले होते. मात्र, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी या खर्चावर आक्षेप घेतला होता. कोणत्या विभागात किती उंदीर मारले असा प्रश्न विचारत त्याबाबत माहिती सादर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने याबाबतची माहिती सादर केली आहे.
No comments:
Post a Comment