मुंबई - मुंबई जगात पुढे असावी यासाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील असते, पुढे राहिल. मात्र काही राजकीय पक्षांचे मित्र खोटे आरोप करून दिशाभूल करीत आहेत. माहिती न घेता टीका केली जाते. दुश्मनी करो, तो जमके करो, पर ये खयाल रहे के कल अगर दोस्त भी बने तो शर्मिंदगी न हो.. अशी शेरोशायरी शुक्रवारी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात करत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी विरोधकांना चांगलेच फटकारले. भाजपला उद्देशून जाधव यांनी निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापालिकेच्या सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पावर शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आपले प्रास्ताविक भाषण केले. भाषणाच्या सुरूवातीला जकातीच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ११ हजार ४२९ कोटी ७३ लाख रुपये दिल्याचे स्पष्ट केले. हे अनुदान पालिकेला यापुढेही मिळणार का, याबाबत पालिका आयुक्तांनी खुलासा का केला नाही, अशी प्रशासनाला विचारणा केली. त्यानंतर अर्थसंकल्पात घोषित केलेली विकासकामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
नगरसेवकांना आयुक्त भेटत नाहीत -
आयुक्त नगरसेवकांना भेटत नाहीत, त्यांना बसवून ठेवले जाते. आयुक्तांसोबत विकासाच्या कामांबाबत नगरसेवकांना चर्चा करायची असते. मात्र भेट दिली जात नसल्याने सर्वसामान्य नगरसेवकांच्या प्रभागातील कामे होत नाहीत. नगरसेवक आयुक्तांच्या विरोधात बोलले तर, त्यांची कामे थांबवली जातात. विरोधकही चांगले काम करूनही कधीच शाबासकी देत नाहीत. अनेकवेळा विरोधच केला जातो. त्यामुळे यांच्यासाठीच आपण भाषणा दरम्यान शेरोशायरीतून उत्तर देण्याचा प्रयत्न केला असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वांद्र्यात होणार डबेवाला भवन -
मागील अर्थसंकल्पात डबेवाला भवन उभारण्याबाबत तरतूद होती. शिवसेनेनेही डबेवाला भवन उभारले जाईल असे आश्वासन दिले होते. यंदाचा अर्थसंकल्प मांडताना विरोधकांनी यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान डबेवाला भवन उभारण्याबाबत आता सकारात्मक पावले उचलण्यात आली आहे. डबेवाल्यांसाठी वांद्रे येथे २८६.२७ चौरस मीटर जागेत डबेवाला भवन बांधून देणार असल्याचे जाधव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment